- अमृता कदमआजकाल प्रवासाला जाताना सामानामध्ये एक गोष्ट एकदम आवश्यक झालीये. ती म्हणजे सेल्फी स्टिक. समुद्रकिनारे असोत की पर्वतरांगा, जंगलातली ट्रीप असो की सुंदर वास्तुशिल्पं असोत, प्रत्येकाला या ठिकाणांपेक्षा तिथे जाऊन स्वत:चीच छबी कॅमेर्यात कैद करण्यात रस असतो. हे काम सोपं होतं ते सेल्फी स्टिकमुळे. पण जगात अशीही काही प्रेक्षणीय ठिकाणं आहेत जिथे सेल्फी काढायला परवानगीच नाही. त्यामुळे तिथे जाताना सेल्फी स्टिक पॅक नाही केली तरी काहीही अडणार नाही. आणि तिथलं सौंदर्यच इतकं भुरळ पाडणारं आणि एकरूप करणारं आहे की आपल्याला सेल्फी काढायला मिळत नाहीये याची हूरहूर वाटत नाही.इथे सेल्फीला परवानगी नाही!
मिलान
तुम्ही जर इटलीला फिरायला जात असाल तर लक्षात ठेवा की मिलानमध्ये सेल्फी स्टिकवर पूर्णपणे बंदी आहे. काही दिवसांपूर्वीच मिलानमध्ये सेल्फी स्टिक, फूड ट्रक आणि अल्कोहोलवर पूर्णपणे बंदी घातलीये. मिलानमधल्या पर्यटकांच्या गर्दीला आवर घालण्याचा एक पर्याय म्हणून ही बंदी घातली गेलीये. सेल्फीच्या नादात रस्ते, प्रेक्षणीय स्थळांच्या इथे लोकं गरजेपेक्षा जास्त वेळ रेंगाळत असल्यामुळे ही खबरदारी घेतली असावी.
इंग्लंड
जर तुम्ही लंडनमधल्या म्युझियम, आर्ट गॅलरींना भेट देत असाल तर तुम्हाला तुमची सेल्फी स्टिक जमा करावी लागेल. वेस्टमिन्स्टर अॅबे, लंडनचा टॉवर, सेंट पॉल कॅथेड्रील किंवा इतर स्थापत्य पाहायला जाताना सेल्फी स्टिकला रजाच द्या. लंडनमधल्या प्रसिद्ध मैदानांवर जातानाही तुम्हाला सेल्फी स्टिक घेऊन जाता येत नाही.
फ्रान्समधल्या या शाही ठिकाणाचं सौंदर्य नजरेत आणि मनात जितकं साठवता येईल तितकं साठवा. पण सेल्फी काढून इथल्या आठवणी सोबत न्यायचा विचार असेल तर तो मात्र सोडून द्या. सुरक्षेच्या कारणामुळे इथे सेल्फी काढता येत नाहीत. तुम्ही जर तुमची सेल्फी स्टिक नेहमीच्या सवयीनं सोबत ठेवली असेलच तर ती तुम्हाला इथल्या सुरक्षा अधिकार्याकडे जमा करावी लागते.न्यूयॉर्कमधली संग्रहालयं
मेट, ब्रूकलिन म्युझियम एमओएमएसारख्या म्युझियम्सनी सेल्फी स्टिकवर केव्हाच बंदी घातली आहे. आता या यादीत बिग अॅपलचाही समावेश झाला आहे. न्यूयॉर्कमधल्या इतरही काही प्रेक्षणीय ठिकाणांच्या इथे सेल्फीला बंदी आहे.चीन आणि जपान
जपानच्या जेआर वेस्ट ट्रेनच्या स्टेशन्सवर सेल्फी स्टीक बाहेर काढण्याचा विचार करु नका. दंडाच्या रूपात तुमच्या खिशाला चांगलीच चाट बसू शकते. चीनमधल्या संग्रहालयांमध्येही सेल्फी स्टीकवर बंदी आहे.मध्य आशिया
इराणमधल्या नॅशनल म्युझियममध्ये नुकतीच सेल्फी काढण्यावर बंदी घातली गेली आहे. सौदी अरेबियामधल्या मक्केमध्येही अजून हे सेल्फी कल्चर पचनी पडलेलं नाही. त्यामुळे मध्य आशियातल्या देशांना भेट देताना कोणत्या ठिकाणी सेल्फी काढता येतो आणि कोणत्या ठिकाणी नाही याची माहिती आधीच करूनघ्या.डिस्ने पार्क
जगभरातल्या डिस्ने पार्कमध्ये2015 मध्ये सेल्फी स्टिकवर बंदी घातली गेली. ही बंदी आजतागायत कायम आहे.कोचैला म्युझिक अॅण्ड आर्ट फेस्टिव्हल
कॅलिफोर्नियामध्ये हा महोत्सव दरवर्षी भरवला जातो. इथे जगभरातून गायक-संगीतकार येतात. तुम्हाला हरतर्हेचं संगीत या महोत्सवात ऐकायला मिळेल. त्याचबरोबर इन्स्टॉलेशन्स, मूर्तीकलेसारख्या वेगवेगळ्या कलाही सादर होतात. हे सर्व कॅमेर्यात कैद करण्यासाठी जर तुम्ही उत्सुक असाल तर मात्र तुम्हाला तुमच्या उत्साहाला आवर घालावा लागेल. कारण सेल्फी स्टिक वापरु न शूट करायला किंवा फोटो काढायला इथे मनाई आहे.
रिओ दि जानिरो
ब्राझीलमधल्या जगप्रसिद्ध कार्निव्हलची हवी तितकी मजा लुटा. पण जर हा कार्निव्हल पाहात असताना तुम्ही तुमच्या बॅगेतून सेल्फी स्टिक काढायची चूक केलीत तर मात्र आजूबाजूच्या लोकांच्या कपाळावर आठ्या पडतील. कारण एवढ्या मोठ्या उत्सवात सेल्फीसाठी धडपडपणं हे ब्राझीलियन लोकांच्या कल्पनेतही येत नाही.फोटोच्या रूपानं प्रवासातल्या आठवणी आपल्या सोबत आणणं वेगळं आणि जिथे-तिथे स्वत:चे फोटो काढण्याचा अट्टाहास करणं वेगळं. पण बर्याचदा हा फरक आपण लक्षातच घेत नाही. कदाचित म्हणूनच सरसकट मनाई करूनन आपल्या अतिउत्साहाला आवर घालण्याचा मार्ग पत्करावा लागतो. केवळ मनाई आहे म्हणून या ठिकाणी सेल्फीच्या मोहाला आवर घालण्यापेक्षा कुठे सेल्फी काढायचा आणि कुठे नाही याचं भान स्वत:मध्ये आणणं अधिक गरजेचं आहे.