भारतामध्ये अनेक नैसर्गिक सौंदर्याने नटलेली आणि ऐतिहासिक वारसा लाभलेली ठिकाणं आहेत. देशो-विदेशीच्या पर्यटकांना ही ठिकाणं नेहमीचं खुणावत असतात. परंतु तुम्हाला माहीत आहे का? भारतातील अनेक अशी ठिकाणं आहेत जी, संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असण्यासोबतच सोशल मीडियावरही प्रसिद्ध आहेत. सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे. सध्या फोटो शेअर करण्यासाठी इन्स्टाग्राम सर्वात जास्त वापरण्यात येतं. आज जाणून घेऊया भारतातील अशा काही खास ठिकाणांबाबत जी सोशल मीडियावर नेहमी चर्चेचा विषय असतात.
1. लदाख
जम्मू-कश्मिरमध्ये असलेलं लदाख एक असं ठिकाण आहे ज्याची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच असते. तेथील निसर्गसौंदर्य पर्यटक डोळ्यांत साठवण्यासोबतच कॅमेऱ्यातही कैद करतात. फोटोशूटसाठी किंवा फोटोगॅलरीसाठी बेस्ट डेस्टिनेशन म्हणजे लदाख. येथे फिरून आल्यानंतर तुमच्याकडे सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी खूप फोटो असतील. येथे फिरण्यासाठी पांगोंग तलाव, हुंडर, खार्दुगला दरा, सोमोरीरी आणि चंद्रताल सरोवर यांचा समावेश आहे.
2. कोडाइकनाल
तमिळनाडूमधील फेमस हिल स्टेशन म्हणजे निसर्गसौंदर्याने नटलेलं सर्वांत लोकप्रिय ठिकाण आहे. येथील हिरवी झाडं, डोंगर-दऱ्या नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतात. हे ठिकाणही फोटोग्राफीसाठी उत्तम आहे. या ठिकाणाची आणि येथे काढणाऱ्या फोटोंची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा असते. येथील बर्यान्ट पार्क, कोकर्स वॉक, पूमबराई गाव, ग्रीन व्हॅली, पिलर रॉक्स, गूना गुहा, सिल्वर कॅस्केड झरा आणि डॉल्फिन्स आकर्षणाची केंद्र आहेत.
3. जयपूर
वाळवंटाचं शहर म्हणून राजस्थान ओळखलं जातं. राजस्थानची राजधानी असलेलं जयपूर हे शहर अनेक ऐतिहासिक वास्तूंसाठी ओळखलं जातं. येथे असणाऱ्या अनेक वास्तू आपल्या शाही अंदाजासाठी ओळखल्या जातात. गुलाबी शहर म्हणून ओळख असणाऱ्या या शहरामध्ये अनेक स्वस्त हॉटेल्सपासून महागड्या आणि हटके हवेल्या नेहमीच पर्यटकांचं स्वागत करत असतात. तुम्ही जयपूरमध्ये आमेरचा किल्ला, जयगढ आणि नहरगढ यांसारखी अनेक ठिकाणं पाहण्यासारखी आहेत. या ठिकाणांचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. याव्यतिरिक्त हवा महाल, जंतर मंतर, सिटी पॅलेस आणि सिरेदेओडी बाजार ही ठिकाणंदेखील प्रसिद्ध आहेत.
4. काश्मीर
भारतातील स्वर्ग म्हणून काश्मीर ओळखलं जातं. जर तुम्ही श्रीनगरपर्यंत विमानाने जाणार असाल तर विंडो सीट मिळवण्याचा प्रयत्न करा. आकाशातून काश्मीरचं सौंदर्य न्याहाळण्यासारखं दुसरं भाग्य नाही. येथे निसर्गसौंदर्याने नटलेल्या ठिकाणांची कमी अजिबात नाही. इन्स्टाग्रामवर सक्रिय असणारी लोक नेहमीच या ठिकाणांचे फोटो शेअर करत असतात. येथील ट्यूलिप गार्डन देशीविदेशी पर्यटकांना नेहमीच भूरळ घालत असतात. तुम्ही येथे डल सरोवर, वुलर सरोवर, नागीन सरोवर, कुपवाडा, पहलगाम, किश्तवाड या ठिकाणांना भेट देऊ शकता.
5. कुमारकोम
केरळमधील कुमारकोम आपल्या बॅकवॉटर्ससाठी प्रसिद्ध आहेत. हे अनेक प्रकारच्या समुद्री आणि ताज्या पाण्यातील माशांच्या प्रजातींसाठी प्रसिद्ध आहे. येथील सुंदर हाउसबोटमध्ये राहण्याचा अनुभव फार सुंदर असतो. येथील कुमारकोम पक्षी अभयारण्य पाहण्यासाठी सुंदर ठिकाणं आहेत. याव्यतिरिक्त अरूविकुज्जी झरा आणि याच्या आसपासच्या बागांमध्ये फिरण्याचा अनुभव फार सुंदर असतो.