- अमृता कदमलग्नानंतर जोडप्यासाठी सर्वांत आनंदाचा वेळ म्हणजे हनीमून अर्थात मधुचंद्र. लग्नाची सगळी गडबड संपून केवळ एकमेकांसोबत घालवण्याचा हा वेळ. त्यामुळेच आजकाल कपल्स हनीमूनसाठी शांत, निवांत काहीशी आॅफबीट ठिकाणं निवडतात. आणि अशा स्थळांमध्ये भारतीयांची पहिली पसंती आहे इंडोनेशियातल्या बालीला.
‘ईझीगो’ या आॅनलाइन ट्रॅव्हल पोर्टलनं केलेल्या एका सर्वेक्षणात बालीला सर्वाधिक भारतीय जोडप्यांनी आपलं मत दिलंय. इंडोनेशिया खालोखाल पसंती मिळाली आहे ती मालदीव आणि थायलंडला.
ईझीगो डॉट कॉमच्या सीईओ आणि संचालक नीलू सिंग यांच्या मते भारतीय जोडप्यांचा कल हा प्रामुख्यानं अशी बीच डेस्टिनेशन्स निवडण्याकडे आहे जिथे ‘व्हिसा आॅन अरायव्हल’ मिळतो. पाचूचं बेट अशी ओळख मिरवणारं, शुभ्र वाळूचे सुंदर समुद्रकिनारे असलेल्या बालीमध्ये ‘व्हिसा आॅन अरायव्हल’ पूर्णपणे मोफत आहे. त्यामुळेच बहुतांशी जोडपी बालीला पसंती देतात. सोने पे सुहागा म्हणजे बालीला असलेली फ्लाइट कनेक्टिव्हिटी.
मालदीव हे बॉलिवूड सेलिब्रिटीजचं सुटी घालवण्याचं आवडतं ठिकाण. ते जगातल्या लक्झरी हॉटेल्ससाठी प्रसिद्ध आहे. पण आता मालदीव हे हनीमून डेस्टिनेशन म्हणूनही लोकप्रिय होत आहे.मालदीवपाठोपाठ नंबर आहे तो थायलंडचा. उत्तम खाणं, मोठमोठी मार्केट्स, निसर्गरम्य ठिकाणं यांमुळे एकंदरितच भारतीय पर्यटकांचा ओढा मालदीवकडे आहे. शिवाय थायलंड तुमच्या बजेटमध्येही बसणारं आहे. म्हणूनच हनीमूनसाठीही थायलंडला पसंती मिळत आहे.
भारतीयांच्या आवडत्या हनीमून डेस्टिनेशन्समध्ये ग्रीस आणि फ्रान्सचाही समावेश होतो. समुद्रकिनारे, आॅलिव्हच्या राई आणि प्राचीन स्थापत्य...ग्रीस तुम्हाला एका वेगळ्याच जगात घेऊन जातो. फ्रान्सच्या रंगीन दुनियेबद्दल तर काही वेगळं सांगायलाच नको. आणि युरोच्या घसरणा-या किंमतीमुळे सध्या हे दोन्ही देश तुमच्या खिशालाही परवडू शकतात.
या यादीतलं सरप्राइज म्हणजे सेशेल्स. जगाच्या नकाशावर भिंग लावून शोधावा लागेल असा हा चिमुकला देश हनीमूनसाठी भारतीयांची पसंती बनतोय. एअर सेशल्सने मुंबई ते सेशेल्स अशी थेट विमानसेवा सुरु केली आहे. तीही आठवड्यातून पाच दिवस. त्याचाच फायदा सेशेल्सला होतोय आणि इथली भारतीय पर्यटकांची गर्दीही वाढतीये. सेशेल्सला हनीमूनला जाणा-या भारतीय पर्यटकांच्या संख्येत गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट झालीये.याशिवाय मॉरिशस हे तर आॅल टाइम फेव्हरेट आहेच. इथलं एक्झॉटिक व्हेकेशन शरीरमनाला ताजंतवानं करतं. ईझीगोच्या यादीत श्रीलंकेनंही जागा पटकावली आहे. बुडापेस्ट आणि स्कॉटलंडलाही ‘रोमॅण्टिक ठिकाणं’ म्हणून भारतीय कपल्सनी आपली मतं दिली आहेत.
ईझीगोचं हे सर्वेक्षण जानेवारी ते जून2017 च्या दरम्यान पर्यटकांकडून आलेल्या हनीमून पॅकेजेससाठी आलेल्या आॅनलाइन इनक्वायरी आणि बुकिंगच्या आकडेवारीवर आधारित आहे.या माहितीनुसार बरीचशी जोडपी अगदी सहा महिने आधीच आपलं हनीमून बुकिंग करतात. तुमचं लग्न ठरलं असेल, तारीख नक्की झालं असेल तर हनीमून पॅकेज बुक करायला उशीर करु नका. ठिकाण ठरवण्यात खूप गोंधळ होत असेल तर डोळे झाकून यातलं एखादं ठिकाण नक्कीच निवडू शकता.