राजस्थानमधील प्रत्येक गाव आणि शहर एक गोष्ट सांगत असतं. असं म्हटलं जातं की, राजस्थानमधील प्रत्येक वास्तूचा एक इतिहास आहे. असचं एक राजस्थानमधील गाव म्हणजे बाडमेर. बाडमेरचं नाव येथील राजा बहाड राव परमार यांच्या राजवटिमध्ये पडलं. राजा बहाड यांच्या राजवटिमध्ये बाडमेर फार समृद्ध होतं. मंदिरं आणि ऐतिहासिक स्मारकांमुळे अनेक दशकांपासून इतिहासकार आणि पर्यंटकांच्या आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. जर तुम्हालाही बाडमेरचा गौरवमय इतिहास अनुभवायचा असेल तर येथे फिरण्यासाठी असलेल्या काही बेस्ट डेस्टिनेशन्सबाबत जाणून घेऊयात. या शहरामध्ये फक्त प्राचिन महालच नाहीत तर निसर्गाची किमया दाखवणारे अनेक सुंदर ठिकाणंदेखील आहेत.
वांकल माता मंदिर
बाडमेर गावामध्ये असलेलं मंदिराचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. या मंदिरात असलेल्या देवीच्या मूर्तीची मान थोडीशी झुकलेली आहे. त्यामुळे तेथील स्थानिक भाषेमध्ये या देवीचं नाव वांकल माता असं ठेवण्यात आलं. हे मंदिर डोंगरावरती स्थित असून येथे अनेक श्रद्धाळू देवीच्या दर्शनासाठी येत असतात.
श्री पार्श्वनाथ जैन मंदिर
बाडमेर प्राचिन काळापासूनचं जैन भिक्षू आणि संतांच्या परंपरेसाठी ओळखलं जातं. येथील नाकोडा मेवानगरमधील पार्श्वनाथांचं मंदिर एक नावाजलेलं धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर 1500 फूट उंचावरती आहे. जैन समुदायासाठी हे पवित्र तिर्थ स्थळ आहे. या मंदिरावर करण्यात आलेलं नक्षीकामही अनेक ऐतिहासिक गोष्टींशी निगडीत आहे.
महाबरमधील वाळूचे डोंगर
महाबरमधील वाळूचे डोंगर संध्याकाळच्या सुर्यास्तावेळी मनमोहक दिसतात. येथे तुम्ही उंटाच्या सफारीचा आनंद घेऊ शकता. मूळ शहरापासून हे वाळवंट 5 किलोमीटर लांब आहे.
राणी भटियाणी मंदिर
बाडमेरमध्ये असलेल्या या मंदिराबाबत अनेक ऐतिहासिक गोष्टी सांगण्यात येतात. या ठिकाणी राणी भटियाणी या आगीमध्ये उडी घेऊन सती गेल्या होत्या. भक्त राणी भटियाणी यांना आदराने मांजी सा देखील म्हणतात. बालोतरा रेल्वे स्टेशनपासून हे मंदिर 5 किलोमीटर दूर आहे.
विजय लक्ष्मी हॅन्डीक्राफ्ट
विजय लक्ष्मी हॅन्डीक्राफ्ट हाताने तयार करण्यात आलेल्या पारंपारिक वस्तूंसाठी प्रसिद्ध आहेत. येथे विविध रंगांच्या स्थानिक वस्तू मिळतात. ज्या दिसायला इतक्या सुंदर असतात की, त्या विकत घेण्यापासून तुम्ही स्वतःला थांबवू शकत नाही.