जगभर भटकंती करणाऱ्यांना पासपोर्टचे महत्व चांगलेच माहिती असते. प्रत्येक देशाचा स्वतःचा खास नियमावली असलेला पासपोर्ट आहे. पासपोर्ट मध्ये अनेक प्रकार असतात. भारतात सुद्धा तीन प्रकारचे आणि तीन रंगाचे पासपोर्ट दिले जातात. त्याचे स्वतःचे खास महत्व आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास करताना पासपोर्ट आवश्यक असतो तसेच त्या त्या देशाचा व्हिसा घ्यावा लागतो.
भारतात निळा, मरून आणि पांढरा अश्या तीन रंगांचे पासपोर्ट वापरात आहेत. तीन वर्षापूर्वी केंद्राने केशरी रंगाचा पासपोर्ट देण्याचा प्रस्ताव मांडला होता पण विरोधकांच्या विरोधामुळे तो मागे घेतला गेला होता. या रंगाचा पासपोर्ट १०वी पेक्षा कमी शिक्षण झालेल्या लोकांना दिला जाणार होता. तसेच या पासपोर्टवर सर्वसामान्य पासपोर्ट प्रमाणे पिता नाव, पत्ता, अन्य महत्वाच्या माहितीचे अंतिम पृष्ठ जोडले जाणार नव्हते.
भारतात सर्वसामान्य नागरिकांसाठी निळ्या रंगाचा पासपोर्ट दिला जातो तर सरकारी अधिकारी, राजकिय महत्वाच्या व्यक्तींना मरून रंगाचा पासपोर्ट दिला जातो. यामुळे देशात तसेच परदेशात सर्वसामान्य नागरिक आणि महत्वाच्या व्यक्ती यांच्यातील फरक लगेच समजू शकतो. मरून रंगाचा पासपोर्ट असलेल्यांना परदेशात जाताना व्हिसाची आवश्यकता नसते तसेच इमिग्रेशन मधून त्यांना त्वरित रिकामे केले जाते. अर्थात असा पासपोर्ट मिळविण्यासाठी वेगळा अर्ज करावा लागतो.
पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट शक्तीशाली मानला जातो. अति महत्वाचे सरकारी अधिकारी, आणि नेते यांना असा पासपोर्ट मिळतो. अधिकृत कामासाठी हा पासपोर्ट उपयुक्त ठरतो. परदेशात कस्टम आणि इमिग्रेशन अधिकारी असा पासपोर्ट सहज ओळखू शकतात आणि अश्या व्यक्तींना फार वेळ न घालवता विमानतळा बाहेर सोडले जाते.