सगळीकडेच आता पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. या दिवसात अनेक अपघात झाल्याचे बघायला मिळतात. अशात या दिवसात गाडी चालवणे जरा कठीण आणि धोकादायक असतं. पण काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही पाण्यात कुठेही अडकणार नाहीत आणि आरामात ड्राईव्ह करु शकाल. चला जाणून घेऊया अशाच काही खास टिप्स...
पाणी साचलेल्या परिसरात जाणे टाळा
पावसाच्या दिवसात काही रस्त्यांवर खूप पाणी साचलं जातं. इतक्या साचलेल्या पाण्यात काही गाड्या चालवणं फारच कठीण होऊन बसतं. त्यामुळे पावसात कुठेही जाण्याआधी त्या मार्गाची माहिती घ्या. त्या रस्त्यावर किती पाणी साचलं असेल याचा अंदाज तुम्ही त्या रस्त्यावरुन जात असलेल्या गाड्यांवरुन आणि चालत असलेल्या लोकांवरुन लावू शकता.
पाण्यात थांबवू नका गाडी
जर पाणी साचलेल्या रस्त्यावरुन तुम्ही गेलाच तर अशा जागेवर अजिबात थांबू नका जिथे पाणी जास्त साचलंय. अशा जागेवर थांबल्यास तुमची गाडी बंद होण्याची शक्यता अधिक असते.
हळूहळू पुढे जा
पाणी साचलेल्या रस्त्यावरुन फार वेगाने गाडी चालवू नये तसेच एकदम ब्रेकही लावू नये. अशा जागेवरुन गाडी हळू आणि एकसारख्या गतीने चालवावी. पाण्यात गाडी थांबवल्यास गाडीचे महत्वाचे पार्ट्स खराब होऊ शकतात.
जर पाण्यात बंद पडली गाडी
जर तुमची कार पाण्यात बंद पडली तर कार लगेच रिस्टार्ट करु नका. कारण याने तुमच्या कारच्या इंजिनाचं नुकसान होऊ शकतं. आधी गाडी पाणी नसलेल्या ठिकाणी घेऊन जा आणि मेकॅनिकच्या मदतीने गाडी सुरु करा.
कारमध्ये अडकले असाल तर...
जर तुमची कार पाण्यात फसली असेल आणि तुम्ही आत अडकले असाल तर घाबरु नका. अशावेळी कशाच्यातरी मदतीने कारच्या खिडकीचा काच तोडण्याचा प्रयत्न करा.
पाण्यातून गाडी बाहेर काढल्यावर...
पाणी साचलेल्या रस्त्यातून गाडी बाहेर काढल्यानंतर पुन्हा पुन्हा ब्रेक लावा. याने गाडीच्या इतर भागात गेलेलं पाणी निघून जाईल. त्यासोबतच ब्रेक ड्रममध्ये गेलेलं पाणीही बाहेर येईल.