तुम्हाला जर ऐतिहासिक आणि भव्य अशा ठिकाणांना भेट द्यायला आवडत असेल तर तुम्ही कर्नाटकातील बादामी गुहांना नक्की भेट द्या. या गुहा आणि येथील शिल्प तुम्हाला थेट इसवीसन 500 शतकांमध्ये घेऊन जातील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या नैसर्गिक गुहा नसून मोठे मोठे डोंगर पोखरून तयार करण्यात आलेल्या गुहा आहेत. त्याकाळात तयार करण्यात आलेल्या या भव्य गुहा पाहून फार कुतुहल वाटतं. कारण एवढ्या पुरातन काळातही निर्माण केलेली ही सुंदर गुहा भल्या भल्या अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून तयार केलेल्या भव्य दिव्य वास्तूकलांनाही मागे टाकते. अनेक देशो-विदेशी पर्यटक येथे भेट देत असतात.
कर्नाटक राज्यातील बगलकोट जिल्ह्यामध्ये स्थित आहे या बदामी नावाचं ठिकाण आणि येथेच आहेत जगभरात प्रसिद्ध असलेल्या बादामी गुहा... येथे या गुहांव्यतिरिक्त अनेक भव्य ऐतिहासिक स्थळं पाहता येतील. यामुळे बादामी जगभरातील अनेक पर्यटकांना आकर्षित करणारं टूरिस्ट डेस्टिनेशन ठरलं आहे. जर तुम्हाला हिल स्टेशन्स किंवा किल्ले आणि महालांपेक्षा वेगळं काहीतरी पाहायचं असेल आणि अनुभवायचं असेल तर कर्नाटकच्या बगलकोटमधील बदामी गुहांना नक्की भेट द्या. येथे तुम्हाला अनेक ऐतिहासिक वास्तूंसोबतच नैसर्गिक सौंदर्यही अनुभवणं शक्य होईल.
(Image Credit : gops.org)
येथे मालाप्रभा नदीजवळच भगवान शंकराला समर्पित असलेलं भूतनाथ मंदिर आहे. बदामीमध्ये इसवीसन 500 ते 700 दरम्यान बांधण्यात आलेला एक भव्य किल्लादेखील आहे. हा किल्ला बदामी किल्ल्याच्या नावानेही ओळखला जातो. या किल्याच्या भिंतींवर आणि छतावर करण्यात आलेलं नक्षीकाम पाहून तुम्ही त्या वास्तूच्या प्रेमात पडाल. या वास्तूशिल्पांमध्ये तुम्हाला द्राविडी स्थापत्य शैलीचा प्रभाव पाहता येईल.
असं पोहोचाल बदामीला...
कर्नाटकमध्ये स्थित असलेल्या बदामी येथे तुम्ही रेल्वे मार्गाने, हवाई मार्गाने किंवा रस्ते मार्गाने जाऊ शकता. जर तुम्ही कमी वेळामुळे प्लाइटने बदामीला जाणार असाल तर तुम्ही हुबळी विमानतळावरून जाऊ शकता. हुबळीपासून बदामीपर्यंत तुम्हाला जवळपास 1 ते 6 किलोमीटरचा प्रवास करावा लागेल.
जर तुम्हाला रेल्वे मार्गाने बदामीला जाणार असाल तर तुम्हाला देशातील कोणत्याही मोठ्या शहरातून कनेक्टिविटी मिळू शकेल. बादामी रेल्वे स्टेशन असल्यामुळे तुम्ही रेल्वे मार्गाने येथे पोहोचू शकाल.