- अमृता कदमयावर्षी आपण देशाचा 70 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी दिलेल्या लढ्याचा इतिहास आपण लहानपणापासून वाचत आहोत. आपल्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं, आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचं स्मरण करण्याचा हा दिवस. पण यावेळेस आपण स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात खास स्थान मिळवलेल्या स्थळांनाही उजाळा देणार आहोत. या ऐतिहासिक ठिकाणी गेल्यावर स्वातंत्र्याचा लढा आपल्या डोळ्यासमोर उभी करणारी अनेक प्रतीकं तिथे आहेत.आपण नेहमी मौजमजेसाठी, आपल्या आनंदासाठी फिरत असतोच. पण आपल्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी, ज्यांच्या त्यागामुळे आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत त्या हुतात्म्यांना एकदा मनापासून नमन करण्यासाठी एखादी ट्रीप प्लॅन करायला काहीच हरकत नाही. वर दिलेल्या ठिकाणांशिवायही स्वातंत्र्यलढ्याशी जोडली गेलेली इतरही स्थळं आहेत. तेव्हा या ठिकाणांना भेट देण्यासाठी म्हणूनही प्रवासाला निघा.
बराकपूर
इथूनच सुरवात झाली भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या लढ्याची अर्थातच 1857च्या उठावाची. मंगल पांडेनं आपल्या वरिष्ठ ब्रिटीश अधिकाºयावर गोळी झाडली आणि बंडाला तोंड फुटलं. मंगल पांडेच्या बलिदानाची आठवण शहीद मंगल पांडे उद्यानाच्या रु पानं जतन केली आहे. हे उद्यान आजकाल पर्यटकांच्या आकर्षणाचा भाग आहे.
झाँसी
खूब लडी मर्दानी वो तो झाँसीवाली रानी थी! जिच्या पराक्र माचे पोवाडे आजही गायले जातात ती झाशीची राणी लक्ष्मीबाई. मैं मेरी झाँसी नही दूंगी, अशी गर्जना करत तिनं ब्रिटीशांना आव्हान दिलं. 1857 च्या बंडात झाँसीचं स्थान अनन्यसाधारण आहे. या लढ्यात ब्रिटीशांना कडवं आणि दीर्घकाळ आव्हान निर्माण करणारे दोन वीर म्हणून तात्या टोपे आणि झाशीच्या राणीचं नाव घेतलं जातं. ज्या किल्ल्यावरु न ती ब्रिटीशांशी लढली तो झाशीचा किल्ला जतन केला आहे. इथल्या राणी महालाची किंवा किल्ल्याची सफर तुम्ही झाशीला गेल्यावर करता येते.
चंपारण्य
चंपारण्यातल्या सत्याग्रहाने गांधीजींना राष्ट्रीय नेता म्हणून प्रस्थापित केलं. 1917 मध्ये बिहारमध्ये गांधीजींनी इथल्या नीळ उत्पादक शेतकर्याचा प्रश्न हाती घेतला आणि पहिल्यांदाच सत्याग्रहाची ओळख भारतीयांना करु न दिली. हा सत्याग्रह यशस्वी होऊन इथल्या शेतकर्याना न्याय तर मिळालाच, पण भारतीय स्वातंत्र्यलढ्यातलं एक सर्वांत महत्त्वाचं अस्त्र अर्थातच सत्याग्रह या लढ्यातूनच विकसित झालं.
चौरीचौरा
उत्तर प्रदेशमधल्या गोरखपूरमधलं हे ठिकाण. देशात 1920 साली सुरु झालेलं असहकार आंदोलन चौरीचौरामध्ये घडलेल्या एका हिंसक घटनेनंतर गांधीजींनी मागे घेतलं. शांततेनं मोर्चा काढणार्या जमावावर पोलिसांनी लाठीमार केला. संतप्त जमावानं पोलिस स्टेशनला आग लावली. चौरीचौराच्या घटनेनंतर 19 जणांवर खटला भरला गेला आणि फाशीची शिक्षा झाली. हे खरंतर सामान्य लोक पण त्यांनी दाखवलेल्या असामान्य धैर्याचा सन्मान करण्यासाठी 1973 साली चौरीचौरा शहीद स्मारक समिती उभारली गेली. जी आजही मोठ्या अभिमानाने आपला इतिहास मिरवत आहे.
काकोरी
काकोरी कटाचं महत्त्व भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अनन्यसाधारण आहे. 9 आॅगस्ट 1925 साली ब्रिटीश सरकारच्या ट्रेझरीची रक्कम उत्तर प्रदेशमधल्या काकोरी या रेल्वे स्थानकावर लुटली गेली. रामप्रसाद बिस्मिल, अशफाकउल्ला खान, राजेंद्र लाहिरी, चंद्रशेखर आझाद, सचिंद्र बक्षी, केशब चक्र वर्ती, मुरारीलाल गुप्ता, बनवारी लाल यांनी या कटाची अंमलबजावणी केली. सशस्त्र क्र ांतीच्या इतिहासातला हा महत्त्वाचा टप्पा. तुम्ही जर उत्तर प्रदेशमधल्या या छोट्याशा शहराला भेट दिलीत तर तुम्हाला काकोरी शहीद स्मारक पहायला मिळतं. आजही या हल्ल्यातल्या शहीदांचा स्मरण काकोरीने ठेवलं आहे.
दांडी
गुजरातमधलं हेच ते ठिकाण जिथे गांधीजींनी मूठभर मीठ उचलून सर्वशक्तिमान ब्रिटीश साम्राज्याला आव्हान दिलं. 1930 साली साबरमती ते दांडी असा पायी प्रवास करून मीठाच्या सत्याग्रहाला सुरूवात केली. या प्रवासात अनेक लोक सहभागी होत गेले. केवळ दांडीचं नाही भारतातल्या इतर भागातही अशा सत्याग्रहाचं लोण पसरलं. या सत्याग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या संख्येने सामान्य लोकांचा सहभाग. दांडीच्या सैफी व्हिलाच्या बाहेर गांधीजींच्या मीठ उचलणार्या पुतळ्याच्या रु पाने या सत्याग्रहाची आठवण जतन केली आहे.