राजस्थानमधील एकमेव हिल स्टेशन माउंट अबू आपल्या नैसर्गिक सौंदर्यासोबतच संस्कृतीसाठीही ओळखलं जातं. मान्सूनमध्ये अनेक ठिकाणी पावसामुळे जाणं टाळण्यात येतं. अशावेळी तुम्ही माउंट अबूची निवड करू शकता. पावसाळ्यामध्ये अरावलीच्या डोंगररांगामध्ये वसलेल्या या ठिकाणाचं सौंदर्य आणखी खुलण्यास मदत होते. येथील हिरवीगार जंगलं, तलाव आणि मंदिरं पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात. जर तुम्हाला कॅम्पिंग, घोडेस्वारी आणि बोटिंग यांसारख्या अॅडवेंचर्स गोष्टींचा आनंद घेण्याची इच्छा असेल तर माउंट अबू तुमच्यासाठी बेस्ट ठिकाण ठरतं.
माउंट अबू फिरण्यासाठी योग्य काळ म्हणजे, सप्टेंबर ते मार्च हा आहे. हिल स्टेशन असल्यामुळे उन्हाळ्यातही तुम्ही येथे जाऊ शकता. अनेक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळं आणि नैसर्गिक सौंदर्य यांमुळे माउंट अबू नेहमीच पर्यटकांना भूरळ घालतं. तुम्ही येथे दिलवाडा जैन मंदिर, नक्की सरोवर, टॉड रॉक, गुरु शिखर, अचलागढ किल्ला, शांती पार्क आणि माउंट अबू वाइल्ड लाइफ सेन्च्युरी यांसारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.
मान्सूनमध्ये येथील नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासारखं असतं. सकाळची सोनेरी सूर्याची किरणं असो किंवा संध्याकाळी लागणारे झगमगते दिवे माउंट अबूचं सौंदर्य आणखी खुलवतात. सर्वात खास गोष्ट म्हणजे, माउंट अबू येथील नाइट लाइफही फार सुंदर असते.
माउंट अबू येथील अभयारण्यदेखील फार सुंदर आहे. येथे तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. बिबट्या, अस्वल, लांडगा, कोल्हा यांसारखे अनेक प्राणी तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच 250 पेक्षा अधिक प्रजातिंचे पक्षीदेखील येथे पाहायला मिळतात. याव्यतिरिक्त माउंट अबूमध्ये एक वेगळा सनसेट पॉइंट तयार करण्यात आला आहे. हा स्पॉट नक्की सरोवरापासून 3 किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे.