नागपंचमी ही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची जन्मतिथी! त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा आणि त्यातून उभारलेल्या शिवसृष्टीचा थोडक्यात आढावा घेतला आहे, इतिहास अभ्यासक कौस्तुभ कस्तुरे यांनी! 'जाणता राजा' अथवा 'राजाशिवछत्रपती' ही नावं कानावर आली की श्री पुण्यश्लोक शिवरायांच्या सोबतच आणखी एका ऋषितुल्य व्यक्तीचा चेहरा मराठी माणसाच्या डोळ्यासमोर आपोआप तरळतो- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा.
आपलं संपूर्ण आयुष्य शिवचरित्राच्या प्रसार आणि प्रचारासाठी अर्पण केलेल्या बाबासाहेबांनी आणखी एक स्वप्न पाहिलं होतं. जागतिक दर्जाची, भव्य दिव्य अशी शिवसृष्टी उभारण्याचं. शिवरायांशी संबंधीत विस्मयकारक घटना आणि गोष्टी इथे निव्वळ वाचायलाच नाही तर अनुभवायला मिळतील. बाबासाहेबांनी या स्वप्नासाठी अक्षरशः अनेक राज्य, किंबहुना काही देश पालथे घातले, तिथलं उत्तमोत्तम आपल्याकडे कसं आणता येईल याचा ते विचार करत राहिले.
इ.स. १९७४ साली दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर बाबासाहेबांनी तात्पुरती शिवसृष्टी उभी केली होती, जिला न भूतो न भविष्यती असा प्रतिसाद लाभला. याच पद्धतीच्या शिवसृष्टीचं रूपांतर कायमस्वरूपी करण्यासाठी बाबासाहेबांनी पुढे हालचाली सुरू केल्या. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान आधीच होतं, त्यामार्फत नव्या जोमाने कामं सुरू झाली. दरम्यानच्या काळात तंत्रज्ञान बदललं, नवीन गोष्टी उजेडात आल्या, लोकांची मानसिकताही बदलली. कायमस्वरूपी शिवसृष्टी उभारायची म्हणजे जागाही तशीच हवी होती. अखेरीस, राज्य सरकारकडून बाबासाहेबांना, अर्थात प्रतिष्ठानला पुण्याजवळ आंबेगाव येथे जागा मिळाली आणि आता स्वप्नं प्रत्यक्षात उतरण्याची चिन्हें दिसू लागली.
गेल्या वीस वर्षात महाराष्ट्रातील राजकारण वेगळ्याच थराला गेल्याने काही काळ या शिवसृष्टीच्या प्रकल्पात खंड पडतो की काय असं वाटलं खरं, पण स्वतः बाबासाहेब आणि प्रतिष्ठान, साऱ्यांनीच आपली उमेद न हरता कामं सुरूच ठेवली. दुर्दैवाने १५ नोव्हेंबर २०२१रोजी बाबासाहेब वयाच्या ९९व्या वर्षी इहलोल सोडून गेले. पण त्यांचं अपुरं स्वप्नं पूर्ण करण्याचा ध्यास मात्र इतर साऱ्यांनीच घेतला होता. ते स्वप्न २०२२ मध्ये पूर्ण झाले.
एकंदर साडेसहा लाख चौरस फुटाच्या प्रस्तावित बांधकामांपैकी पस्तीस हजार चौरस फुटांचा 'सरकारवाडा' पूर्णपणे बांधून तयार झाला आहे. एक प्रमुख चौक असलेला हा प्रचंड वाडा पाहताच आपण थेट सतराव्या शतकात जातो. जुनी कवाडं, भलेथोरले दरवाजे, कमानी, नक्षीदार छत, काचेची तावदानं आदी अनेक गोष्टींनी हा वाडा नटला आहेच, पण त्यावर साज चढला आहे तो नव्याने तयार झालेल्या शिवकाळाच्या प्रदर्शनाचा.
शिवसृष्टीच्या या पहिल्या टप्प्यात आपल्याला निरनिराळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती ज्यावर प्रोजेक्शन्सच्या सहाय्याने हालचाली पाहता येतील, अशा पाहता येतील. याशिवाय, शिवराज्याभिषेकाचं, शस्त्रांचं स्वतंत्र दालन असेल. शिवरायांच्या साऱ्या शत्रूंची समकालीन चित्रकारांनी काढलेली लघुचित्र आपल्याला एका दालनात पाहता येतील. लंडनमध्ये असलेल्या जगदंबा तलवारीची हुबेहूब प्रतिकृती आपल्याला इथे पाहता येईल. महाराजांची आग्रा भेट आणि रायगडची हवाई सफर ही दालनं विशेषत्वाने शिवप्रेमींना आवडतीलच, पण त्याहूनही आणखी एक खास गोष्ट एका वेगळ्याच दालनात घडणार आहे. प्रत्यक्ष शिवराय आपल्याशी संवाद साधणार आहेत! कसे? ते मात्र शिवसृष्टीला भेट दिल्याशिवाय समजायचं नाही.
हे सारं उभारण्यासाठी असंख्य हात गेले काही महिने झटत आहेत. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे सारे विश्वस्त, गार्डीअन मीडिया अँड एंटरटेनमेंटचे सारे विशेषज्ञ-तंत्रज्ञ आदी सारे रात्रीचा दिवस एक करत आहेत. या साऱ्यांच्या परिश्रमाचे प्रतिबिंब आपल्याला या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्यात नक्की पाहायला मिळेल. या प्रकल्पाच्या रूपाने बाबासाहेबांना वाहिलेली ही आदरांजली आहे असे म्हणता येईल!