अनेकदा आपण पर्यटनस्थळी फिरायला किंवा काही कामानिमित्त बाहेरगावी जातो. तेव्हा संबंधित शहरात आपण एक ते दोन दिवस थांबतो. अशावेळी राहण्याची व्यवस्था सहसा एखाद्या हॉटेलमध्ये (Hotel) केली जाते. शहरात उंच बहुमजली हॉटेल्स असतात. अशावेळी उंचावर असलेली खोली आपल्याला मिळावी असं वाटतं. कारण, तिथून शहर पाहता येतं. तुम्हीही कधी हॉटेलमध्ये थांबल्यानंतर वरच्या मजल्यावरच्या खोलीला प्राधान्य देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
ट्रॅव्हल सिक्युरिटी एक्सपर्टच्या (Travel Security Expert) मते, प्रवाशांनी हॉटेलच्या चौथ्या मजल्याच्या वर असलेल्या कुठल्याही मजल्यावरच्या खोलीत शक्यतो राहू नये. तसंच दोन मजल्याच्या खाली असलेल्या खोलीत न राहण्याचा सल्ला सुरक्षा तज्ज्ञ लॉइड फिगिंग्ज (Lloyd Figgins) यांनी दिला आहे. त्यांच्या या सल्ल्यामागे काय कारण आहे? ते आपण जाणून घेऊया.
लॉइड यांनी लष्करात काम केले आहे. सैन्यातून निवृती घेतल्यानंतर त्यांनी ट्रॅव्हल क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 'द ट्रॅव्हल सर्व्हायव्हल गाइड' (The Travel Survival Guide) नावाचं पुस्तकही लिहिलं आहे. एखाद्याने फक्त दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यादरम्यान असलेल्या खोल्यांमध्ये वास्तव्य करावं, असं ते सांगतात. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे 'आगीचा धोका' हे आहे. बहुतेक लोक या धोक्याकडे दुर्लक्ष करतात आणि आग लागल्यास त्यांचा जीव धोक्यात पडतो.
सन ऑनलाइन ट्रॅव्हलला दिलेल्या मुलाखतीत लॉइड यांनी सांगितलं, की एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर ती जागा तुमच्यासाठी नवी असते. तुम्ही पूर्णपणे अनोळखी असता. हॉटेल चालक तुम्हाला हॉटेलमध्ये संपूर्ण चोख व्यवस्था असल्याचे सांगून तुमचा विश्वास जिंकतात. पण, जेव्हा एखाद्या आपत्तीच्या वेळी अलार्म वाजतो, तेव्हा एकच गोंधळ उडतो. आशा परिस्थितीमध्ये व्यक्ती घाबरून जाते. आता आपण काय करावं हा प्रश्न तिला पडतो. त्यामुळे आग लागणं किंवा इतर आपत्तीच्या काळात जीव वाचवण्यासाठी हॉटेलमधून लवकर बाहेर पडणं कठीण होतं. त्यामुळे नेहमी एखाद्या हॉटेलमध्ये खोली बूक करताना आग लागल्यानंतर तेथून बाहेर पडण्याचा मार्ग पाहून ठेवावा.
याशिवाय, तुम्ही राहत असलेली खोली आणि फायर एस्केपचं (Fire Escape) ठिकाण यांच्यामधील दारांची संख्या मोजा, जेणेकरून जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, तर तिथून सुटका करणं सोपे जाईल. कठीण परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी नेहमी आपली खोली ही इमारतीच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यापर्यंतच बूक करा. कारण, फायर ब्रिगेडच्या पायऱ्या क्वचितच चौथ्या मजल्यावर पोहोचतात.
याशिवाय, दुसऱ्या मजल्याच्या खालच्या मजल्यावरही खोली बूक करू नये. यामुळे दुसऱ्या मजल्याखालील खोलीतील वस्तू चोरीला जाण्याचा धोका असतो. तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील खोल्यांना चोर सहज लक्ष्य करतात, असे त्यांनी सांगितले. तसेच हॉटेलमधील तुमच्या खोलीचा क्रमांक कुणालाही मोठ्याने सांगू नका. कारण, हॉटेलमध्ये कोण आले आहे, यावर चोरट्याची नजर असते. ते चोरी करू शकतात. त्यामुळे दक्षता घेणं आवश्यक आहे, असं लॉइड यांनी सांगितलं आहे. तुम्हीही विचारपूर्वक वागून सावध राहणं गरजेचं आहे.