केरळमधील नेरियामंगलम देशातील अनेक सुंदर ठिकाणांपैकी एक मानलं जातं. कारण या ठिकाणावर चारही बाजूंनी केवळ हिरवीगार जंगलं आहेत. त्यामुळे इथे वेगवेगळे पक्षी, प्राणी बघण्याची मोठी संधी मिळते. मुन्नार, सूर्यनेली आणि मरायूरला जाण्याच्या मार्गातच नेरियामंगलम हे ठिकाण लागतं. त्यामुळे तुम्हालाही जर निसर्गाच्या सानिध्यात फिरण्याची आवड असेल तर या ठिकाणाची पैसा वसूल ट्रिप काढू शकता.
डॉ. सलीम अली यांच्या नावाने पक्षी अभायरण्य
थट्टेकडमध्ये जवळपास २५ किलोमीटर परिसरात सलीम अळी पक्षी विहाराची स्थापना १९८३ मध्ये केली गेली. प्रसिद्ध पक्षी अभ्यासक सलीम अली इथे दोनदा आले होते. या ठिकाणी २५० प्रकारचे पक्षी बघायला मिळू शकतात. केरळ सरकारकडून पक्ष्यांच्या सुरक्षेसाठी इथे खास व्यवस्था ठेवली आहे. याच परिसरात काही हॉटेल्स आणि सरकारी इमारती आहेत. जिथे तुम्ही थांबू शकता.
फुलपाखरांची अनोखी दुनिया
तट्टेकायई पक्षी अभयारण्याचा एक भाग फुलपाखरांसाठी ठेवला आहे. हे ठिकाण फुलपाखरु प्रेमींसाठी स्वर्ग मानली जाते. कारण इथे वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुलपाखरांना जवळून बघता येतं. फुलपाखरांचे अभ्यासक इथे चांगलीच गर्दी करुन असतात. त्यामुळे तुम्हालाही फुलपाखरांची आवड असेल तर इथे भेट देऊन तुम्हाला आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही.
वालरा वॉटरफॉल आणि हत्ती जंगल
नेरियामंगलमच्या आजूबाजूलाही बघण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. केरळमधील उंच धबधब्यांपैकी एक चियापारा नेरियामंगलमपासून १० किमी अंतरावर आहे. या धबधब्याला बघण्यासाठी लोक खासकरुन सायंकाळी जातात. कारण त्यावेळी इथलं वातावरण फार खास असतं. इथेच बाजूला मामलकंडम नावाचं एक स्थान आहे. जे हत्ती जंगल म्हणून प्रसिद्ध आहे. जंगलाच्या या भागात नेहमीच हत्ती बघायला मिळतात.
कसे जाल?
येथून सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आलुवा ४५ किमी अंतरावर आहे. जे देशातील सर्वच रेल्वे स्टेशनांशी जोडलं आहे. तर जवळचं एअरपोर्ट कोचीन ५१ किमी अंतरावर आहे. हे ठिकाण कोच्ची-धनुषकोटि मार्गावर असल्याने इथे पोहोचण्यासाठी सतत बसेस किंवा टॅक्सी सुरु असतात.