माथेरान : काही महिन्यांपूर्वी मिनीट्रेनची नेरळ माथेरान प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेस पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र दोनच फेऱ्या असल्याने अनेक पर्यटकांना या सेवेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे या सेवेच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी होत आहे. ही सेवा सुरू झाल्यापासून कायम ‘हाउसफुलचा’ बोर्ड लागत आहे.
रेल्वे प्रशासनाने मात्र येथील भौगोलिक परिस्थिती पाहता जी शक्य आहे ती सेवा आपण देत असल्याचे म्हटले आहे. या मिनी ट्रेनची सफर करता यावी यासाठी करता देश-विदेशातूनही अनेक पर्यटक येत असतात. एका गाडीने एकावेळी द्वितीय श्रेणीतून ९० तर प्रथम श्रेणीतून फक्त ३० प्रवासी प्रवास करू शकतात. मात्र मिनीट्रेनने जाण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात. फक्त दोनच फेऱ्या होत असल्याने त्या कमी पडत आहेत.
मुळात हा ट्रक अवघड जागेवर आहे. त्यामुळे या सेवेला काही मर्यादा आहेत. त्यामुळे जे परिचलन करता येईल तेवढे रेल्वे प्रशासन करीत आहे. पूर्वीच्या व आताच्या वेळेत फरक झालेला नाही. २०१८ ला एका फेरीला दोन तास ५० मिनिटे लागत होती. आतही दोन तास ४५ ते ५० मिनिटेच लागत आहेत. - प्रवीण पाटील, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
माथेरानमधून २.४० वा सुटणाऱ्या मिनी ट्रेनकरिता १२ वाजल्यापासून तिकिटासाठी रांग लावली होती; परंतु या गाडीचे तिकीट मिळाले नाही. त्यानंतर चार वाजताच्या गाडीचे तिकीट मिळाले व हा प्रवास पावणे तीन तासांचा होता. म्हणजे बारा वाजल्यापासून ते पावणेसात वाजेपर्यंत पूर्ण दिवस या प्रवासात गेला तरी या गाडीची वेळ कमी करून यादरम्यान फेऱ्या वाढवाव्यात. - मंटरिओ, पर्यटक
पंचवीस वर्षांपूर्वी आमची मुले लहान असताना या गाडीने प्रवास केला होता व आज त्याच मुलांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा नेरळ माथेरान गाडीने प्रवास केला; परंतु या प्रवासाकरिता लागणारा वेळ खूपच जास्त आहे. तरीही हा प्रवास आनंद देणारा आहे. त्यामुळेच या गाडीच्या फेऱ्या वाढवून प्रशासनाने जास्तीत जास्त पर्यटकांची सोय करावी. - जिग्नेश पटेल, पर्यटक, सुरत