- अमृता कदमट्री-हाऊस म्हणजे काय हे थोडक्यात सांगायचं तर पक्षांच्या घरट्यात राहिल्याचा फील अनुभवतानाच हॉटेलच्या सर्व सुविधा जिथं मिळतात ते ठिकाण. मूड फ्रेश करणारी ही ट्री-हाऊस’ची सहल प्रत्येकानं करावी अशी आहे. फक्त यासाठी हवामान, वातावरण नीट बघून गेलात तर या ठिकाणी तुम्ही सुट्टीचा भरपूर आनंद लुटू शकाल. असे ट्री हाऊस शोधत असाल तर भारतात इतर राज्यांप्रमाणे ते आपल्या महाराष्ट्रातही आहेत.
हॉर्निबल ट्री-हाउस रिसॉर्ट, दांडेली
गोव्यापासून जवळपास 125 किलोमीटर दूर अंतरावर कर्नाटकच्या दांडेली इथे काली नदीच्या किनार्यावर वसलेलं हे अप्रतिम ट्री-हाऊस रिसॉर्ट आहे. इथे आल्यावर तुम्हाला एखाद्या जादूनगरीत आल्याचा फील येईल. हिरव्यागर्द आणि भल्यामोठ्या वृक्षांच्या सान्निध्यात वसलेलं हे ट्री-हाऊस निवांतपणाच्या बाबतीत कुठल्याही पंचतारांकित हॉटेलपेक्षा कमी नाही. पक्षीप्रेमींसाठी तर वास्तव्याचं अगदी आदर्श ठिकाण आहे हे.
द ट्री-हाऊस रिसॉर्ट, जयपूर
जयपूरपासून अगदी तासाभराच्या अंतरावरच हे प्रशस्त रिसॉर्ट आहे. नुसती भटकंती करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करु इच्छिणार्यासाठी अगदी योग्य ठिकाण हे. सुट्टी संपल्यावरही बराच काळ तुमच्या मनाचा एक कोपरा इथल्या सुंदर वृक्षराजीत नटलेल्या ट्री हाऊसवरच रेंगाळत राहील हे नक्की!
ट्री-हाऊस हाइडवे, बांधवगढ़
बांधवगढच्या व्याघ्र अभयारण्याला जोडूनच हे रिसॉर्ट आहे. इथल्या वास्तव्यात तुम्हाला वन्यजीवनाचे कधीही न अनुभवलेले पैलू दर्शनास येतील. जंगल ज्यांना समजून घ्यायचंय, जंगल ज्यांना जगून पाहायचंय त्यांच्यासाठी अद्भुत अनुभव देणारं हे ठिकाण आहे. अर्थात हे करताना जंगलातल्या असुविधांचा मात्र कुठलाच त्रास होणार नाही याची काळजी हे रिसॉर्ट नक्की घेतं.मनाली ट्री-हाऊस कॉटेज
परिवारासोबत छान वेळ व्यतीत करायचा असेल, नव्या आठवणी जोडायच्या असतील तर मनालीमधल्या या ट्री-हाऊसपेक्षा योग्य ठिकाण क्वचितच सापडेल. तुम्हाला घराचा फील तर येईल पण घरातल्या जबाबदार्यापासून पूर्णपणे मुक्त असल्यानं तुम्ही इथे कुठलाही तणाव न घेता केवळ मन:शांती, निवांतपणाच अनुभवाल. शिवाय या ट्री-हाऊसमधून घडणारं हिमालयातल्या अनेक रांगांचं दर्शनही विलोभनीय.
व्यर्थी ट्री-हाउस रिसॉर्ट, केरळ
केरळमधलं हे आलिशान ट्री-हाऊस पर्यटकांमध्ये खूपच प्रसिद्ध झालंय. शहराच्या धकाधकीपासून अगदी दूर वसलेलं हे ठिकाण एकांताचा मस्त फील देतं. इथला हिरवागर्द परिसर तुम्हाला एकदम नि:शब्द करु न टाकतो. निसर्गाच्या कुशीत शिरून निवांतपणा अनुभवण्याची संधी या रिसॉर्टमध्ये मिळते.
वन्य ट्री हाउस, केरळ
कोची आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळपास तीन तासांच्या अंतरावर हे ट्री हाऊस वसलेलं आहे. थेक्कुड्डी परिसरात पेरियार नदीच्या काठावर हे ट्री हाउस उभारलेलं आहे. इथल्या बाल्कनीतून इडुक्की पर्वतरांगांचं मनोरम दृश्य अनुभवायला मिळतं. अशा शांत वास्तव्यात मिळणारा आनंद हा केवळ अवर्णनीय असाच.
चूननांबर बॅकवाटर रिसॉर्ट, पुद्दुचेरी
पुद्दुचेरीपासून अगदी आठ किलोमीटर अंतरावर वसलेलं हे ठिकाण. चूननांबरचा किनारा आणि बॅकवॉटरमध्ये हे रिसॉर्ट बांधण्यात आलंय. निसर्ग जणू तुम्हाला आलिंगन देऊन तुमचं स्वागत करतोय असाच फील इथे प्रवेश करताक्षणी येतो. दुसरंतिसरं काही न करता केवळ स्वत:ला या निसर्गाच्या हवाली करायचं. इथे जावून आल्यावर तुम्ही जवळपास वर्षभरासाठी रिचार्ज होऊन याल.
दी मचान, महाराष्ट्र
देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्रापासून अगदी अडीच तासांच्या अंतरावर वसलेलं हे रिसॉर्ट. लोणावळ्याजवळच्या जांभुळणे परिसरात आहे. हे ठिकाण म्हणजे जगातल्या 25 जैविक हॉट स्पॉटपैकी एक आहे. 30 ते 45 फुट उंच झाडांवर वसलेलं हे भव्य ट्री-हाऊस तुम्हाला एका विलक्षण आनंदाची अनुभूती देईल.
नेचर झोन रिसॉर्ट, मुन्नार
दक्षिण भारताची यात्रा मुन्नारच्या या नेचर झोन रिसॉर्टशिवाय खरंतर पूर्णच होऊ शकत नाही. अगदी बारकाईनं झाडांची निवड करु न त्यावर हे रिसॉर्ट बांधण्यात आलंय. एका रहस्यमयी दुनियेचं दर्शन इथून होतं. इथल्या खिडक्यांमधून तुम्ही काननदेवचे डोंगर न्याहाळू शकता. शेजारी तरंगणारे ढगांचे थवे तुम्हाला परिकथेच्या दुनियेत घेऊन जातील.हॉटेलच्या खोल्यांमध्ये तर आपण नेहमीच राहतो. पण थेट निसर्गाच्या कुशीत राहण्याचा अनुभव तुम्हाला ट्री-हाऊसमध्ये राहताना मिळतो. त्यामुळेच एकदा तरी हा अनुभव घेऊन पाहायलाच हवा.