- अमृता कदम
परदेशप्रवास म्हटलं की सगळ्यांत आवश्यक गोष्ट म्हणजे पासपोर्ट आणि व्हिसा. अनेकांचा पासपोर्ट तयार असतोच, पण व्हिसासाठी अर्ज करताना काय काळजी घ्यायची, त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात, भारतीयांना कोणत्या देशांमध्ये प्रवासाला जाताना व्हिसासाठी अर्ज करावा लागतो आणि कुठल्या देशात व्हिसाशिवायही प्रवास करावा लागतो याबद्दल मात्र अनेकजण ट्रॅव्हल एजंटवरच अवलंबून असतात. शिवाय प्रत्येक देशाचे व्हिसासंबंधीचे नियमही वेगवेगळे असतात. त्यामुळे व्हिसासाठी अप्लाय करताना काही बेसिक गोष्टींची माहिती करून घेणं केव्हाही चांगलं.
व्हिसाबद्दल थोडं महत्वाचं .
व्हिसाचा विचार करता देशांची विभागणी तीन गटांमध्ये करता येते. एक म्हणजे असे देश जिथे प्रवासाला जाण्यापूर्वी तुमच्याकडे व्हिसा असणं गरजेचं आहे. दुसरा गट अशा देशांचा करता येतो जिथे गेल्यानंतर तुम्हाला व्हिसा मिळतो. तिसरा गट व्हिसा-मुक्त देशांचा. म्हणजे या तिसऱ्या प्रकारच्या देशांमध्ये प्रवासाला जाताना व्हिसाची गरज नाही.
भारतीय नागरिकांना कोणत्याही देशाच्या व्हिसासाठी अर्ज करताना साधारणपणे खालील कागदपत्रं लागतात-
1.वैध पासपोर्ट
2.व्हिसासाठीचा अर्ज
3.पासपोर्टसाइज फोटोग्राफ्स
4.तुमच्या परतीच्या प्रवासाचे किंवा पुढच्या प्रवासांचे कन्फर्मड तिकिट
5.व्हिसासाठी आवश्यक रकमेची पूर्तता केल्याची पावती.
काही देशांध्ये तुम्हाला या बेसिक कागदपत्रांशिवायही काही गोष्टीं व्हिसाच्या अर्जासोबत जोडाव्या लागतात.
1.ट्रॅव्हल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी
2.तुम्ही जेवढ्या काळासाठी त्या देशात राहणार आहात, त्या कालावधीसाठीचे तुमच्या निवासस्थानासंबंधीचे पुरावे
3.तुमच्याकडे पुरेसे पैसे आहेत यासंबंधीचे देखील पुरावे जोडावे लागतात. भारतीय पासपोर्टवर तुम्ही 23 देशांमध्ये व्हिसाशिवाय जाऊ शकता. म्हणजे तुम्हाला कोणत्याही पेपरवर्कची गरज नाही. तुमचा पासपोर्ट, प्रवास करताना लागणारी कागदपत्रं आणि खिशात पुरेसे पैसे टाकले की तुम्ही प्रवासासाठी तयार. तुम्हाला जर तातडीनं एखादी फॉरेन ट्रीप प्लॅन करायची असेल तर तुम्ही कागदपत्रांच्या झंझटमध्ये न पडता या व्हिसा फ्री देशांचा आॅप्शन ट्राय करु शकता.
व्हिसा फ्री देश
1. इंडोनेशिया- इंडोनेशियामध्ये ज्या 169 देशांचे प्रवासी व्हिसाशिवाय प्रवेश करु शकतात त्यामध्ये भारताचाही समावेश आहे. अर्थात या व्हिसा फ्री प्रवासासाठीही अर्थातच काही नियमही आहेत. पर्यटकांसाठी असलेली ही व्हिसा-फ्री सुविधा 30 दिवसांसाठीच आहे. आणि त्याला कोणतीही मुदतवाढ मिळत नाही. तुम्ही पर्यटन, कौटुंबिक भेटी, काही सोशल गॅदरिंग, कला आणि सांस्कृतिक अभ्यासाठी, एखाद्या सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी तसेच सरकारी कामासाठी आला असाल, तर तुम्हाला या टूरिस्ट व्हिसा फ्री फॅसिलिटीचा लाभ घेता येऊ शकतो.
2. मालदीव- सुंदर समुद्रकिनारे आणि आलिशान हॉटेल्ससाठी प्रसिद्ध असलेलं मालदीव हे अनेक भारतीयांसाठी फेव्हरेट हनीमून डेस्टिनेशन ठरत आहे. मालदीवच्या इमिग्रेशन नियमांच्या चौकटीत राहून तुम्ही इथे व्हिसा-फ्री जाण्याचा आनंद घेऊ शकता.
3. मकाऊ- कॅसिनो आणि शॉपिंग मॉल्सची रेलचेल असलेले मकाऊ हे पूर्वेचं लास वेगास म्हणून ओळखलं जातं. भारत मकाऊसाठी व्हिसा आणि एन्ट्री परमिट फ्री यादीमध्ये येतो. व्हिसा नसला तरी जाताना जवळ कोणती कागदपत्रं बाळगायची हे तुम्हाला मकाऊ सरकारच्या मकाऊ इमिग्रेशन सव्हिसेस आॅफ पब्लिक सिक्युरिटी पोलिस फोर्सच्या वेबसाइटला भेट दिल्यानंतर लक्षात येईल. पर्यटकांसाठी आकर्षण असणारे हे देश उदाहरण म्हणून दिले आहेत.
शिवाय 28 देश भारतीयांना प्रवेशानंतर व्हिसा देतात. (व्हिसा आॅन अरायव्हल). त्यांपैकी काही फिरायला जाण्याच्या दृष्टीनं सुंदर असे देश म्हणजे थायलंड, सेशेल्स, जॉर्डन. परदेशी फिरायला जाताना व्हिसासंबंधीच्या अजूनही काही बारीक-सारीक गोष्टी माहित करु न घ्या. म्हणजे तुम्हाला कागदपत्रांच्या माहितीसाठी दुसऱ्यावर विसंबून रहावं लागणार नाही. आणि जर व्हिसा फ्री देशांमध्येच जायचा प्लॅन असेल तर मग व्हिसा मिळेल की नाही या धाकधुकीचं कारणच नाही!