मणिपूर राज्याची राजधानी इंफाल हे शहर आपल्या वेगळेपणासाठी चांगलंच लोकप्रिय आहे. शांत आणि सुंदर नैसर्गिक नजारे, अनोखं वाइल्डलाइफ, तरंगते द्वीप येथील सुंदरतेत भर घालतात. सोबतच येथील आणखी एक गोष्ट मनात घर करून जाते ती म्हणजे येथील लोकांचा स्वभाव. इतके शांत आणि मनमिळावू लोकांसोबत थोडा वेळ घालवला तरी ते आपल्यातीलच एक वाटतात. जर तुम्ही आता उन्हाळ्यात कुठे फिरायला जाण्याच प्लॅनिंग करत असाल तर तुम्ही इथे भेट देऊ शकता. कारण नोव्हेंबर ते एप्रिल इथे फिरण्यासाठी परफेक्ट कालावधी मानला जातो.
इंफाल हे शहर मणिपूरची राजधानी आहे जे ७ डोंगरांनी वेढलेलं आहे. तसेच हे शहर सांस्कृतिक आणि व्यावसायिक दृष्टीनेही प्रमुख केंद्र आहे. इंफालमध्ये तुम्हाला फिरण्यासाठी अनेक पर्याय आहेत. इथे असलेली युद्ध स्मशानभूमी किंवा वॉर सिमेट्री, द्वितीय महायुद्धात मारल्या गेलेल्या भारतीय आणि ब्रिटीश सैनिकांना श्रद्धांजली देण्याचा उद्देशाने तयार करण्यात आलं होतं. हे ठिकाण फार शांत आहे आणि हे ठिकाण स्टोन मार्करच्या माध्यमातून मेंटेन ठेवण्यात आलं आहे.
गोविंदाजी मंदिर
मणिपूरच्या पूर्व शासकांच्या महालाच्या बाजूला तयार केलेलं हे मंदिर वैष्णन पंताच्या भाविकांमध्ये लोकप्रिय आणि पवित्र मंदिर आहे. तसं तर हे मंदिर फार साधं आहे. पण इथे मिळणारी शांतता आणि येथील सुंदरता आपल्याला आध्यात्माशी जोडते.
लोकटक लेक आणि सेंद्रा द्वीप
पर्यटकांनी या ठिकाणाला आवर्जून भेट दिली पाहिजे. इंफालपासून साधारण ४८ किमी अंतरावर असलेलं सेंद्रा द्वीप लोकटक लेकच्या मधोमध एखाद्या वर आलेल्या डोंगरासारखं दिसतं. लोकटेक लेक नॉर्थ इस्टचं सर्वात मोठं फ्रेशवॉटर लेक आहे. या लेकच्या समोरच काही छोटे छोटे आयलॅंड आहेत.
केबुल लमजाओ नॅशनल पार्क
संगाई नावाच्या स्थानिक प्रजातीचे दुर्मिळ हरण म्हणून हा नॅशनल पार्क ओळखला जातो. हा नॅशनल पार्क इंफालपासून साधारण ५३ किमी अंतरावर आहे. हा सुंदर नॅशनल पार्क लोकटेक लेकच्या किनाऱ्यावर स्थित आहे.
कसे पोहोचाल?
हवाई मार्गाने जाण्याचा प्लॅन असेल तर मणिपूर एअरपोर्ट आहे. जे देशातील सर्वत प्रमुख शहरांशी जोडलेलं आहे. हे इंफालपासून केवळ ८ किमी अंतरावर आहे. जर तुम्हाला रेल्वे मार्गाने जायचं असेल तर मणिपूरला रेल्वे स्टेशन नाही. पण येथील रेल्वे स्टेशन हे दीमापूर आहे. हे इंफालपासून २१५ किमी अंतरावर आहे. जर तुम्हाला रस्ते मार्गाने जायचं असेल तर तुम्ही गुवाहाटी, अगरतला, दीमापूर, शिलॉन्ग आणि कोहीमा शहराहून बसने इंफालला जाऊ शकता.