पावसाळ्यात भारतातल्या कोणत्या राज्यांमध्ये फिरायला जाल?....
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 03:22 PM2018-06-07T15:22:20+5:302018-06-07T15:22:20+5:30
जून आणि जुलै महिन्यात भारतातल्या कोणत्या राज्यात फिरायला जायचे असा विचार करत असाल तर काही उत्तम पर्याय तुमच्यासाठी आहेत
नवी दिल्ली- केरळपाठोपाठ एकेक राज्यामध्ये मॉन्सूनने धडक द्यायला सुरुवात केली आहे. चार महिन्यांच्या उन्हाळ्यानंतर येणाऱ्या पावसाची सर्वच भारतीय वाट पाहात असतात. आता पावसाळ्यामध्ये कोठेतरी फिरायला जायचे प्लॅन्सही होत असतील. जून आणि जुलै महिन्यात भारतातल्या कोणत्या राज्यात फिरायला जायचे असा विचार करत असाल तर काही उत्तम पर्याय तुमच्यासाठी आहेत.
केरळ
गॉड्स ओन कंट्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळला पावसाळ्यात तुम्ही भेट देऊ शकता. एकीकडे निळाशार समुद्र आणि दुसऱ्या बाजूला गच्च हिरवाई अशा आनंददायक निसर्गरम्य राज्यात तुम्ही फिरायला जाऊ शकता. भारतामध्ये नैऋत्य मॉन्सून केरळमधून प्रवेश करतो. मॉन्सूनचा आनंद घेण्यासाठी आणि खास केरळी पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी केरळला नक्की भेट द्या.
हिमाचल प्रदेश
हिमालय पर्वतरांगामध्ये अनेक पर्यटनस्थळे विकसीत झाली आहेत. हिमाचल प्रदेशातील हिल स्टेशन्सना तुम्ही पावसाळ्यातही भेट देऊ शकता. कसौली आणि कसोल येथे तुम्ही जाऊ शकता. त्याचप्रमाणे काल्पा, चित्कुल, ताबो येथेही पर्यटकांसाठी चांगल्या सोयी उपलब्ध आहेत. उन्हाळ्यामुळे आलेला शीण घालविण्यासाठी हिमाचल प्रदेशातील हिल स्टेशन्स एक उत्तम पर्याय ठरू शकतात.
सिक्किम आणि दार्जिलिंग
सिक्किम हे भारताच्या ईशान्येस असलेले राज्य आहे तर दार्जिलिंग हे हिल स्टेशन पश्चिम बंगालमध्ये आहे. सिक्किममध्ये आता लवकरच रेल्वेची आणि विमानाची सोय होणार आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी उत्तम सोय होऊ शकेल. दार्जिलिंगमधील चहाच्या मळ्यांचे निसर्गरम्य दृश्यही तुम्हाला अनुभवता येऊ शकेल.