- सारिका पूरकर- गुजराथीएका मुलीचं एका पत्नीत, आईत रुपांतर झाल्यावर तिच्या स्वातंत्र्याला किती कात्र्या लावल्या जातात हे भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीला नवीन नाही. मात्र जगभरातही काही देशांमध्येही स्त्रिया ही जोखडं नाकारु शकत नाहीत. फ्रान्स हा त्यापैकीच एक देश. फ्रान्समध्येही जिप्सी संस्कृतीनं महिलांना नानाविध बंधनात जखडून टाकलय. आपल्याकडे जसे भटके-विमुक्त लोकं, तसेच हे जिप्सी. जादू-टोणा, भविष्य सांगणे, घोड्यांचा व्यापार, धातूकाम अशी कामं करणारी ही जमात. साहजिकच मागासलेली. तर अशा या जमातीतील महिलांना सतत सामाजिक, कौटुंबिक मुस्कटदाबी सहन करावी लागली आहे. मग या महिलांच्या मनात किती घालमेल असेल? स्वच्छंदी जगण्यासाठी त्यांना किती धडपड करावी लागत असेल? याचा धांडोळा फ्रान्सच्या नेऊस सोला या बार्सिलोनाच्या महिला छायाचित्रकारानं तिच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून घेतला. तिला या महिलांचे जे भावविश्व दिसलं ते तिनं कॅमेऱ्यात बंदिस्त केलं. त्या छायाचित्रांची एक मालिकाच तिनं तयार केली. नवी दिल्लीत इंटरनॅशनल वुमन फोटोग्राफर्स अॅवार्ड या छायाचित्र प्रदर्शनात ‘ द वुमेन दे सॉ ’ या संकल्पनेवर आधारित ही छायाचित्रं सादर करण्यात आली.
या आगळ्या-वेगळ्या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे केवळ महिला छायाचित्रकारांचे हे प्रदर्शन आहेच शिवाय ८४ देशांमधील ७८५ छायाचित्रकारांमधून केवळ ११ महिला छायाचित्रकारांच्या छायाचित्रांची निवड या प्रदर्शनासाठी करण्यात आली . अॅण्टिडोट आर्ट अॅण्ड डिझाईन, दुबईतील माय आर्ट स्पाय ही संस्था तसेच इंटरनॅशनल वुमन फोटोग्राफर्स असोसिएशन यांनी हे प्रदर्शन आयोजित केलं होतं.. मिडल इस्ट, आशिया, युरोप या प्रांतातील दुबई, लाहोर, कुवेत,पॅरिस, कैरो आणि भारतातील कोलकता या शहरांमधून महिला छायाचित्रकारांची निवड झाली होती. व्यावसायिक आणि हौशी स्तरावर महिला छायाचित्रकारांना उपेक्षाच सहन करावी लागते. केवळ २० टक्के महिला छायाचित्रकारांनाच संधी मिळते, असे नुकतेच समोर आलेय. त्यांच्या छायाचित्रण कलेलाही व्यासपीठ, प्रोत्साहन मिळावं म्हणून प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणून त्यांनाही मान्यता मिळावी हा या प्रदर्शनाचा मुख्य हेतू होता.
दरम्यान जिप्सी महिलांच्या छायाचित्र मालिकांविषयी सोला म्हणाली की ‘मी जिप्सी महिलांबाबत एक निरीक्षण केलं आहे की लहानपणी या महिला मुली असतात तेव्हा खूप स्वच्छंदी जगतात, मात्र जसं त्यांचं लग्न होतं तेव्हा त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं. त्या त्यांच्या नवऱ्याची एक प्रॉपर्टी बनून राहतात. चुल आणि मूल या पारंपरिक विचारसरणीच्या जात्यावर तिला भरडलं जातं. मग अशा महिलांना जगणं नीरस वाटू लागतं. जिप्सी संस्कृतीतही लग्न ठरलेल्या मुलीला तिच्या चारित्र्याची परीक्षा ‘रुमाल’ चाचणीनं द्यावी लागते (भारतातही ही प्रथा काही ठिकाणी आहे.) हे सर्व खूप भयानक आहे. या जिप्सी महिलांचा आत्मसन्मान मिळवून देणं गरजेचं आहे.
जिप्सी मुलगी आणि विवाहित जिप्सी स्त्री या दोघींच्या जगण्यातील फरक सोलानं तिच्या छायाचित्रातून मांडला आहे. तिने एका छायाचित्रात एका कारच्या टपावर चार महिला स्कर्ट आणि शर्ट घालून कशा शांत बसून राहिल्या आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नाहीयेत. जणूकाही आपापली दु:खे त्या एकमेकींशी बोलून दाखवताहेत, अशा आर्विभावाचे ते छायाचित्र आहे. आणि दुसऱ्या छायाचित्रात एक जिप्सी मुलगी पिंक जीन्स घालून खुल्या, मोकळ्या जागेवर उभी राहून तिच्या हातातील कागदाचे तुकडे हवेत भिरकावून देते आहे...असे करताना ती किती मोकळी आहे, स्वतंत्र आहे हेच तिच्या देहबोलीतून जाणवतेय...या दोन छायाचित्रांतून सोलाने जिप्सी महिलांची घुसमट प्रतिबिंबित केलीय. प्रदर्शनात भारताकडून कोलकत्याची २२ वर्षीय रणिता रॉय या युवतीला आपलं छायाचित्र मांडण्याची संधी मिळाली. रणितानं तिच्या ८० वर्षीय आजीचं छायाचित्र सादर केलं आहे. या छायाचित्रात रणिताची आजी भानुमती दास उर्फ चोरडीमा तिच्या नातवाबरोबर व्यापार हा खेळ खेळताना दिसतेय. खेळताना ती नातवाबरोबर किती रमून गेलीय याचा आनंद चोरडीमाच्या चेहऱ्यावर दिसतोय. रणिताला तिच्या आजीत एक परिपूर्ण भारतीय स्त्री दिसली. रणिता म्हणते, ‘भारतीय परंपरेत स्त्रियांना शिकून काय करायचेय? स्वयंपाकघरच सांभाळायचेय लग्नानंतर..ही धारणा हजारो वर्षांपासूनची आहे. घरात आणि बाहेर दोनही ठिकाणी पुरुष म्हणेल तीच पूर्व दिशा हे वर्षानुवर्षे चालत आलेय. खरं तर पत्नी म्हणून एक महिला तिच्या पतीला सुख-दुखा:त साथ देते, सर्व कुटुंबाची जबाबदारी सांभाळते पण तरीही तिला दुय्यमच मानलं जातं . तरीही माझ्या आजीनं नेहमीच हे सगळं हसतमुखानं स्वीकारलं. तक्रार न करता जगत आलीय ती. आजोबांच्या निधनानंतर तिनं स्वत:ला नातवंड, बाग-बगीचा, स्वयंपाकघरात मदत अशा कामांमध्ये व्यस्त ठेवत आनंदी ठेवलंय. मला तिच्या या सकारात्मकतेचा अभिमान वाटतो!’
प्रदर्शनात स्त्रीचे आणखी एक गंभीर रुप आपल्या समोर येते ते इराणच्या सोहिला सानाम्नो हिच्या छायाचित्रातून. या छायाचित्रात सोहिलाचे प्रमुख पात्र आहे रोघाय्ये ही २६ वर्षीय महिला. रोघाय्येवर काही वर्षांपूर्वी पाशवी बलात्कार झालाय. या घटनेनंतर कुटुंबानं आणि समाजानं तिची सतत हेटाळणीच केली. त्यामुळे रोघाय्ये निर्जीव बाहुली बनून गेलीय. या छायाचित्रात ती एका टेबलखाली एकदम धास्तावून बसलेली टिपलीय. वर तिचा भाऊ कपडे शिवण्याचे काम करतोय, या भावाची मुलं सांभाळण्याची सक्ती रोघाय्येवर केली जातेय...दुसरीकडे कुवेतच्या फराह सालेम हिनं स्त्रीची वेगळीच व्यथा मांडलीय. तिने तिच्या छायाचित्रात एका महिलेला एका बॉक्समध्ये (जणू पिंजराच) अडकल्याचं दाखवलय. आणि हा बॉक्स वाळवंट, समुद्रकिनारा येथे तिने ठेवलाय. या चित्रातून फराह सांगतेय, की समाजानं तर महिलांना नेहमीच प्रथा-परंपरेत अडकवून अस्तित्त्वहीन बनवलंय परंतु महिलांनीही स्वत:च्या मर्यादांना बांधून ठेवलंय. त्या स्वत:च मोकळ्या होऊ पाहत नाहीयेत. आणि ही बंधनं समाजानं घातलेल्या बंधनांपेक्षा जास्त हानीकारक आहेत...आणि हे छायाचित्र त्या प्रदर्शनामध्ये विजयी ठरले. जगभरातील महिलांच्या भावविश्वाचं, त्यांच्या जगण्याचं हे प्रतिबिंब अस्वस्थ करणारं आहे, त्याचबरोबर नवी प्रेरणा देणारंही आहे. इंटरनेटवर ‘द वुमेन दे सॉ’ नावाचा सर्च टाका तुम्हाला यातली काही छायाचित्र पाहायला मिळतील!