फिरण्याची आवड असणाऱ्या लोकांना नेहमी अशा ठिकाणाचा शोध असतो, जिथे फार कुणी गेलेलं नसेल अशाच एका ठिकाणाबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या ठिकाणी तुम्ही एकदा गेलात तर आयुष्यभरासाठी इथे गेल्याच्या अनेक आठवणी तुमच्या स्मरणात राहतील.
भारतात आजही अशी अनेक ठिकाणे आहेत, जी लोकांच्या नजरेपासून फार दूर आहेत. जिथे आजही लोकवस्ती नाही. अशा ठिकाणांबाबत फार कमी लोकांना माहिती असते. अशीच एक डोंगरांमध्ये असलेली गुहा आहे. भारतातील सर्वातील लांब गुहांपैकी ही एक गुहा असल्याचं बोललं जातं.
मेघालयाच्या डोंगरांमध्ये सिजू गुहा आहे. डोंगरांमधील या गुहेची लांबी ४ किमी आहे. ही भारतातील दगडांपासून तयार सर्वात लांब गुहा मानली जाते. या गुहेची खासियत म्हणजे या गुहेत सहजासहजी जाता येत नाही. या गुहेच्या आत एक वाहती नदी आहे. गुहेत जाताना गुडघ्यांपर्यंत पाणी येतं.
(Image Credit : holidayiq.com)
जर गुहेच्या अंधारात हरवण्यापासून वाचायचं असेल तर एक गाइड सोबत नेण्यात शहाणपणा ठरेल. ते नदीच्या मधून चालत तुम्हाला मार्ग दाखवतील.
कसे पोहोचाल?
सिजू गुहेपर्यंत जाण्यासाठी सर्वातआधी तुम्हाला गुवाहाटी पोहोचावं लागेल. इथे पोहोचण्यासाठी देशातील जवळपास सर्वच मुख्य शहरांमधून रेल्वे सेवा आणि हवाई सेवा आहे. गुवाहाटीपासून गुहेचं अंतर साधारण २१६ किमीचं आहे. या गुहेला भेट देण्याचा सर्वात चांगला कालावधी ऑक्टोबर ते डिसेंबर आणि मार्च ते मे हा मानला जातो.