- मुक्ता चैतन्य
तुम्ही AI हा शब्द नक्की ऐकला असेल. तुम्हाला माहीत आहे का? AI म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स. यापुढचं तंत्रज्ञान आणि त्यावर अवलंबूनअसलेलं माणसांचं जग AI वरच चालणार आहे, असं मानलं जातंय. आज तुम्हाला ज्या मुलाची गोष्ट सांगणार आहे तो AI मध्ये काम करणारा जगातला सगळ्यात लहान तज्ज्ञ आहे. त्याच नाव तन्मय बक्षी. तन्मय भारतीय वंशाचा आहे; पण कॅनडात राहतो. त्याचे बाबा कम्प्युटर इंजिनिअर असल्याने अगदी छोटा होता तेव्हापासून तो कम्प्युटर हाताळायचा. त्याची गोडी लागली. शिवाय तो होम स्कूलिंग करायचा त्यामुळे त्याला कम्प्युटरसाठी भरपूर वेळ देता आला आणि हळूहळू तो कम्प्युटर प्रोग्रामिंग एक्स्पर्ट झाला. सुरुवातीला त्याने अनेक अॅप्स तयार केली. त्यावर पुस्तक लिहिलं. भाषणं दिली. मग पुढे त्याला अॅप्सच्या जगाचा कंटाळा आला. त्याला अजून काहीतरी अॅडव्हान्स करायचं होतं. याच काळात तो AI कडे वळला. मग त्याने स्वत:चा यू-टय़ूब चॅनल सुरू केला. तंत्रज्ञानाच्या निरनिराळ्या प्रश्नांची उत्तरं तो त्याच्या यूटय़ूब चॅनलवरून देतो. गॅजेट्स वापरताना, किंवा इतरही काही प्रश्न तुम्हाला असतील तर तन्मयच्या यूटय़ूब चॅनलवरून तुम्हाला त्याची उत्तरं मिळू शकतात.
कसा पाहायचा हा व्हिडिओ?
तन्मयच्या यू-टय़ूब चॅनलचं नाव आहे तन्मय टिचेस. यू-टय़ूबवर जाऊन tanmay bakshi artificial intelligence हे की वर्ड सर्च करा. त्याचा यू-टय़ूब चॅनलही तुम्हाला सापडेल आणि त्याचे इतर व्हिडीओ ही!