बघता बघता 2020 अर्धा भाग त्या कोरोनाने खाल्ला. सुरुवातीला कोणालाच काही कळत नव्हतं, सगळ्या बाजूंनी नुसत्या अफवा उठत होत्या. लॉकडाऊन फार सिरीयस होता. कोणीच कुठे जाऊ शकत नव्हतं. मोठ्या माणसांना या प्रकारचं सॉलिड टेन्शन आलं होतं आणि ते टेन्शन कळत - नकळत लहान मुलांपयर्ंत आपोआप पोचत होतं. त्यामुळे मार्चपासूनचा बराचसा काळ काय करायचं आणि काय नाही करायचं याचं गणित सोडवण्यातच गेला. त्यामुळे धावपळ झाली, काहीही प्लॅनिंग करता आलं नाही आणि बराचसा वेळ वाया गेला अशी भावना अनेकांच्या मनात आहे. पण त्यावेळी त्याला काही इलाजही नव्हता.पण आता परिस्थिती बदलली आहे. हळूहळू उद्योग सुरु होतायत. हा कोरोना नेमका काय आहे, त्याने किती नुकसान होऊ शकतं, आपल्याला त्याचा त्रस होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची याचा बराच अंदाज आता आपल्याला आलेला आहे. आणि त्यात एक गोष्ट सगळे पुन्हा पुन्हा सांगतायत ती म्हणजे कोरोना काही एवढ्यात जाणार नाही. मग आपण काय करायचं? नुसतं बसून राहायचं का?तर आपण असे नुसते बसून राहणारे लोक आहोत का? नाही ना? मग याही वेळी आपण बसून राहायचं नाही, तर आहे त्या परिस्थितीत आपण त्यातल्या त्यात काय करू शकतो ते करायचं.
आत्ता, सगळ्यात आधी, उरलेल्या 2020 मध्ये आपल्याला काय काय करायचं आहे याची यादी करा. त्यात काही प्रयोग करून बघायचे असतील, पुस्तकं वाचायची असतील, नवीन कौशल्य शिकायची असतील. जे काय करावंसं वाटत असेल ते लिहून काढा आणि तुमच्या नजरेसमोर राहील असं भिंतीवर चिकटवून टाका. त्यातली जी गोष्ट तुम्ही कराल त्यापुढे बरोबरची खूण करा. म्हणजे तुम्हाला उरलेल्या वर्षाकडे बघतांना बरं वाटेल, आणि वर्षाअखेरीस तुमच्या लक्षात येईल, की 2020 क्चे पहिले महिने जितके वाईट गेले त्यापेक्षा नंतरचे सहा महिने पुष्कळच चांगले गेले. बघा करून!