- गौरी पटवर्धन
रोज सकाळी उठलं की तुमचा पहिला प्रश्न, ‘आज मी काय करू?’. त्यावर आईचं उत्तर, ‘सकाळी सकाळी कटकट करू नकोस. तुमची शाळा सुरू होती तेच बरं होतं. तुझं तू बघ!’- या सगळ्यापासून सुटका पाहिजे असेल तर तुमच्या जुन्या झालेल्या कपडय़ांचं गाठोडं उघडा. त्यात एखादी तरी जुनी जीन्स असेलच. तुमच्या जुन्या कपडय़ांमध्ये नसेल तर ताईच्या/ दादाच्या/ काकाच्या/ मावशीच्या/ आत्याच्या कोणाच्या तरी कपडय़ांमध्ये एखादी जुनी जीन्स नक्की सापडेल. ती स्वच्छ धुवा. वाळवा. तिला इस्री करा. आता आपला कच्चा माल तयार आहे. या जीन्सपासून आपल्याला काय काय करता येईल ते बघा.
1. जीन्स आपल्या मापाची असेल तर तिची शॉर्ट्स करता येईल. आपल्याला पाहिजे तेवढं माप घेऊन जीन्स कापायची. आणि मग आईने कितीही सांगितलं तरी त्याला खालून टीप घालायची नाही. खालचे काही दोरे काढायचे आणि मग खालच्या दशा चक्क विंचरायच्या. जीन्सची शॉर्ट्स तयार!
2. जीन्सचे दोन्ही पाय जिथे वेगळे होतात तिथे जीन्स कापायची. खालून शिवण मारायची. वरून एक चेन किंवा वेल्क्रो किंवा बटणं लावायची. खालच्या पायांच्या पट्टय़ा बनवून त्याचा बेल्ट करायचा. जीन्सची बॅग तयार! जीन्सचे सगळे खिसे त्या बॅगेचे कप्पे म्हणून वापरता येतात.
3. मुलींसाठी जुन्या जीन्सचे पाय उसवायचे. ते समोरच्या आणि मागच्या बाजूला शिवायचे. आणि मग आपल्याला पाहिजे तेवढय़ा उंचीवर स्कर्ट कापायचा. त्याला मात्र खालून शिवण घालायची.
4. अगदी फाटलेली जीन्स असेल तर तिच्या फक्त दोन हिप पॉकेट्सचं वॉल हँगिंग बनवायचं.
सगळ्यात महत्त्वाचं.. आई आणि बाबाची जीन्स घेण्यापूर्वी सावधान! चुकीची जीन्स फाडलीत तर सुट्टीतले सगळे उद्योग बंद होण्याचा धोका आहे.