समुद्रातले सुंदर सुंदर मासे, जेली फिश, पेंगविन्स आणि इतरही जलचर प्राणी समजा तुमच्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर लाईव्ह आले तर?म्हणजे बघा हा, हल्ली फक्त माणसंच लाईव्ह स्ट्रीम करू शकतात असं कुठेय? प्राण्यांनाही ही सोया उपलब्ध आहेच. कशी म्हणून काय विचारता? व्हर्चुअल टूर्समधून. अमेरिकेतल्या जॉर्जिया अक्वेरियमने त्यांच्याकडे असलेल्या जलचर प्राण्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग सुरु केलं आहे. वेबकॅमच्या माध्यमातून त्यांच्या वेबसाईटवर ते उपलब्ध आहे. आणि ते भन्नाट आहे.
आपल्या स्क्रीनवर निळ्याशार पाण्यात हलकेच पोहणारे पिवळसर जेलीफिश बघताना जाम मज्जा येते. इकडून तिकडे करणारे, आळसावटलेलं पेंग्विन्स बघतांना फार भारी वाटतं. वॉटर प्रूफ कॅमेरे वापरून माश्यांचं लाईव्ह जग बघता येतं. मगरीची पिल्लं कॅमेरे ओलांडून जाताना तुम्ही घरबसल्या बघू शकता. आहे की नाही धम्माल. यापूर्वी आपण अभयारण्यातल्या व्हर्चुअल टूर्स केल्या होत्या. आता घरात बसून अक्वेरिअमची टूरही करूया. त्यासाठी गुगलवर जा आणि इंग्रजीत टाईप करा: Georgia aquarium virtual tour. त्यांची वेबसाईट ओपन होईल ज्यावर व्हर्चुअल टूरचे अनेक व्हिडीओज आहेत. तुम्हाला जे मासे बघायचे असतील तो व्हिडीओ चालू करा आणि जलचर प्राण्यांच्या जगाची सैर करून या