तैतूम बाऊमन ही पाच वर्षाची छोटीशी मुलगी. सध्या यू ट्यूबवरील तिच्या व्हिडीओला खूप लाइक्स मिळत आहेत. असं त्या व्हिडीओत आहे तरी काय?तर त्या व्हिडीओमध्ये इवलीशी तैतूम कोरोना व्हायरसशी कसं लढायचं हे सांगते. ती म्हणते, ‘मला माहिती आहे तुम्ही सर्व खूप घाबरलेले आहात. पण ओके. शांत राहा! नाक पुसण्यासाठी टिश्यु पेपरचा वापर करा. पौष्टिक अन्न खा. पण घाबरू नका. शांत राहा! तुम्हाला जर खूप भिती वाटली तर दीर्घ श्वास घ्या. पण असं करताना आपल्या आजी आजोबांपासून लांब राहा नाहीतर आजी आजोबा आजारी पडतील’ एवढ्याशा तैतूमला एवढं कसं माहिती? तिला मोठ्यांनी शिकवलं असेल का बोलायला?
-तर नाही मोठ्यांनी तिला असं बोलायला सांगितलं नाही. पण मोठ्यांच ऐकून पाच वर्षाच्या तैतूमला कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती खूप गंभीर झाल्याचं मात्र लक्षात आलं. तैतूमची आई रॅशेल एलीस ही सतत तैतूम सोबत गप्पा मारत असते. तैतूमला तिच्या आईनं शाळेत का जायचं नाही? घरीच का बसून राहायचं? पार्कमध्ये खेळायला का जायचं नाही? हे सर्व नीट समजावून सांगितलं. तैतूमला आई जे सांगत होती ते कळत होतं. मग तैतूमला वाटलं आापल्याला जे कळलं ते आपल्या मित्र मैत्रिणींनाही कळायला हवं. म्हणून तिनं तिच्या आईला व्हिडीओ करायला सांगितला. आणि तिच्या आईनं रेकॉर्डिंग सुरू केलं. तैतूमनं आपल्या आईकडून जेवढं ऐकलं ते सर्व ती सांगू लागली. तिचा व्हिडीओ तिच्या आईनं यू ट्यूबवर टाकला. त्या व्हिडीओला 18,000च्या पुढे लाइक्स मिळाले. तैतूमला तिच्या आईकडून मनानं स्ट्रॉंग होण्याचेही धडेही मिळतात. तैतूमला तिची आई नेहेमी म्हणते की, ‘अवघड प्रसंग आला तर घाबरायला होतं. पण चिंता करायची नाही. घाबरायचं नाही. जेव्हा भिती वाटेल तेव्हा दीर्घ श्वास घ्यायचा. त्यामुळे मनातली भिती पळून जाते आणि मनात छान विचार यायला लागतात.
तैतूमनं आपल्या आईकडून जे ऐकलं ते आपल्याला सांगितलं. आता आपण तैतूमचं ऐकायचं ना? म्हणजे जेव्हा आपल्याला भिती वाटेल तेव्हा आपणही दीर्घ श्वास घेऊन बघू या!