मॅक्स आणि लेवी ही दोन मुलं ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमधे राहतात. शाळांना सुट्टी लागली आहे. पण ही मुलं आपल्या मित्रंना भेटू शकत नाहीयेत, कारण नेहेमीप्रमाणो ही मजेची सुटी नाही याची कल्पना दोघांनाही आहे. कोरोना व्हायरसमुळे त्यांनाही काय होतंय आजूबाजूला याची चिंता होतीच. पण घरात बसून दोघेही कंटाळले.एके दिवशी मॅक्सनं एक बकेट घेतली. त्यात घरातले खडू भरले आणि सोबत लेवीलाही घेतलं. आपली मुलं कुठे चालली आहेत, याकडे त्यांच्या आईचं लक्ष होतं. आई खिडकीतून बघत होती. मुलं खूप लांब गेली नाही. थोडया अंतरावर जाऊन मॅक्स थांबला. आणि बकेटमधला खडू घेऊन रस्त्यावर चित्रं काढू लागला. त्यानं रस्त्यावर इंद्रधनुष्य काढलं. त्याखाली हसत राहा असा संदेश लिहिला. थोड्या अंतरावर जाऊन त्यानं पुन्हा एक इंद्रधनुष्य काढलं आणि त्याच्याखाली लिहिलं काही काळजी करू नका. आपण सर्व सोबत आहोत, हसत राहा!असा संदेश लिहिला. मॅक्स जेव्हा चित्र काढत होता तेव्हा त्याचा लहान भाऊ लेवी त्याच्याशेजारी खेळत होता.
आपल्या मुलांची ही कृती त्यांच्या आईला खूप आवडली. तिनं त्याचा व्हिडीओ बनवून फेसबुकवरून व्हायरल केला. व्हिडीओला खूप लाइक्स आले. या अवघड परिस्थितीत आपण सर्वजण एकत्र आहोत हे मॅक्ससारख्या लहान मुलालाही समजत आहे आणि तो इतरांनाही आपण एकत्र आणि एकमेकांच्या सोबत असल्याचा विश्वास देतो आहे हे खूप महत्त्वाचं आणि कौतुकाचं वाटलं.आता मेलर्बनमधील इतर मुलंही मॅक्स आणि लेव्हीच्या या चित्रचं अनुकरण करत आहे. तेही रस्त्यावर चित्रं काढत आहेत. त्याखाली आपण सर्व सोबत असल्याचा आणि कठीण परिस्थितीतही हसत जगण्याचा संदेश देत आहे. मेलबर्नमधील रस्ते सध्या अशा खडूंच्या चित्रंनी भरून गेले आहे. मोठेही या चित्रखाली आम्हाला तुमचं खूप कौतुक वाटतं, तुम्ही खूप छान काम करत आहे असा प्रतिसाद देत आहेत.