ही गोष्ट आहे एका आजीची, नातीची आणि त्या दोघी खेळत असलेल्या खेळाची. खेळ आपला नेहेमीचाच. सर्वाच्या परिचयाचा. पण त्या दोघी तो ज्या पध्दतीनं खेळत आहेत, त्यामुळे त्याची चर्चा जगभर होते आहे. त्या दोघींच्या खेळाचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. ही आजी आणि नात टीक टॉक टो हा खेळत आहेत, म्हणजे आपण खेळतो ना, तो गोळा-फुलीचा खेळ! पण एकमेकींच्या जवळ बसून नाही. तर त्या दोघींमध्ये खिडकीची काच आहे. या काचेवर टीक टॉक टो ची चौकट आखून दोघींचा मस्त खेळ चालू असतो. या दोघी अशा खेळत असताना या छोटीच्या आईनं लगेच व्हिडीओ शूट केला आणि तो आपल्या फेसबुकवरून व्हायरल केला. आज कॅनबेरामधील असे अनेक आजी आजोबा आहेत ज्यांना आपल्या नातवंडांना भेटायचं आहे, त्यांच्याशी खेळायचं आहे. पण कोरोनामुळे हे बहुतेकांच्याबाबतीत शक्यच होत नाहीये. पण हा व्हिडीओ बघून अशा प्रकारे खेळण्याची प्रेरणा अनेक आजी आजोबांना मिळावी, लांबून का होईना नातवंडांना बघण्याचा , त्यांच्याशी खेळण्याचा आनंद घेता यावा हा पर्याय सूचवण्यासाठी या छोटीच्या आईनं हा व्हिडीओ फेसबुकवरून व्हायरल केला.
छोटीची आजी छोटीच्या घरापासून काही मीटर अंतरावरच राहते. त्यादिवशी फ्ल्यूची टेस्ट करायला म्हणून आजी त्याच भागातील दवाखान्यात गेली. जाता जाता नातीला भेटावं म्हणून नातीला खिडकीत बोलावलं. आणि खिडकी बंदच ठेवायला लावली. एकमेकींशी बोलता बोलता त्यांना टीक टॉक टो खेळण्याची इच्छा झाली. आणि ती त्यांनी काचेवर खेळाची चौकट आखून पूर्ण केली. प्रेम, आपुलकी यामध्ये कोरोनासरखे विषाणूही येऊ शकत नाही हे या आजीनं आणि नातीनं दाखवून दिलं आहे.