आता यंदा तर काय मज्जाच झाली. बिनापरीक्षाच पास झाले ना सगळे. करोना पास! पण मग आता या सुटीत करायचं काय? तर एक मज्जा करून पाहू. म्हणजे काय, ग्रो युअर प्लाण्ट्स अँड टॉक टू देम. शाळेत शिकतोच ना आपण की झाडं-रोपं सजीव असतात, ते ऐकतात, संगीत ऐकून खुश होतात. त्यांना भावना असतात. मग आपणही तोच प्रयोग करून पाहिला तर? घरच्या घरी. घराबाहेर न जाता, आपल्या गॅलरीत, खिडकीच्या चौकटीतपण जमेल. -त्याला म्हणायचं इटुकली शेती. आणि या शेतीत आपण इटुकलं बी लावून, पिटुकली रोपं उगवून त्यांच्याशी गप्पा मारू..
गप्पा काय मारायच्या?
- काहीपण. आपली दोस्तच असतात ही रोपं. आपल्या मनातलं त्यांना सांगता येतं, त्यांच्या वाढीची काय प्रगती आहे, हे त्यांना सांगता येईल. मस्त छानसं गाणं त्यांना म्हणून दाखवता येईल. पानांवरून प्रेमानं हात फिरवता येईल. हा घरातला नवा दोस्त तयार करू आपण.
त्यासाठी करायचं एवढंच.
1. तुम्ही बाहेरून जेवण मागवलं असेल तर ते प्लॅस्टिकचे डबे घ्या. त्याला एक-दोन छिद्र पाडा.
2. श्रीखंडाचे डबेही चालतील रिकामे, नाहीतर तुपाचे डबे, फुटलेली बरणीही चालेल.
3. बी आणायला घराबाहेर जायचंच नाहीये. घरात मेथी दाणो असतील. गहू आहेत. बटाटा आहे एखादा मोड आलेला किंवा धणो तर असतीलच असतील. झेंडूची निर्माल्यातली वाळलेली फुलं, आल्याचा तुकडा असं काही जमवा.
4. धणो थोडेसे पोळपाटावर रगडून कुंडीत घाला.
5. मेथी दाणोही चार-पाच लांब लांब मातीत पेरा.
6. थोडेसे गहू घाला. त्यात एक-दोन मोहरी दाणोही घाला.
7. झेंडूचं फूल टाका कुस्करून मातीत.
8) आणि मग एकदिवसाआड संध्याकाळी थोडं थोडं पाणी घाला.
9) कोंब फुटले की मस्त गप्पा मारा. फोटो काढा.
10) आणि आपलं रोप कसं वाढतंय याची डायरी करा.