- राजीव तांबे
साहित्य :टेबल टेनिसचा पिंगपाँग बॉल.रुंद तोंडाची ऊंच बाटली. (बाटलीची ऊंची सुमारे 1 फूट असावी.) टेबल.टेबलावरील बॉलला स्पर्श न करता तो बाटलीत गेला पाहिजे. यासाठी खेळाडूने बॉलला फूंक मारायची नाही. टेबल हलवायचं नाही. बाटली तिरकी किंवा आडवी करायची नाही. बाटली हातात ऊभीच धरायची आहे. आणि मग बॉलला बाटलीत खेळवायचं आहे.
तर करा सुरू :1. प्रथम टेबलावर पिंगपाँगचा बॉल ठेवा. त्याच्या बाजूला बाटली ठेवा.2. आता बॉलवर बाटली पालथी ठेवा.3. दोन हातांनी बाटली गच्चं धरून, बाटली टेबलावर जोरात गरगर फिरवा.4. बाटलीचा वेग वाढला की बॉल वर बाटलीत उसळू लागेल.5. पटकन बाटली सरळ करा. गरगरणारा बॉल बाटलीत असेल.6. आता या सुलट्या बाटलीत बॉलला खेळवा.7. बॉल मात्र बाटलीतच राहिला पाहिजे.8. बॉल जमिनीवर पडला किंवा बॉलला स्पर्श केला तर खेळाडू आऊट.
असं का होतं :बाटलीच्या कडा गोल असल्याने चेंडू गोल फिरू लागतो. त्यामुळे निर्माण झालेलं केंद्रगामी बल चेंडूला गोलातच फिरत ठेवतं आणि बाटलीच्या दिशेने वर-वर चढायला उद्युक्त करतं. त्याचवेळी बाटली उचलली की आपोआप चेंडू बाटलीतच जातो.