आमची शाळा सुरूच झाली नाही यावर्षी तर? घरात बसून बसून कंटाळा आलाय, सारखं काय काहीतरी शिका? आईबाबा तर थोडे दिवसांनी ऑफिसला जातील शाळा चालूच झाली नाही तर आम्ही मुलांनी काय करायचं? अश्विन काळसेकर , सांगली
अश्विन, शाळा परत सुरु होणारच नाही असा विचार करू नकोस. तुम्हा मुलांना खूप कंटाळा आलाय, हे अगदीच मान्य आहे आणि खरंतर मुलांचं सगळ्यात जास्त कौतुक आहे सध्याच्या कोरोनाच्या काळात. तुम्ही मुलांनी जे धैर्य दाखवलं आहे ते तर मोठ्या माणसांनाही दाखवता आलेलं नाही. त्यामुळे आपण सकारात्मक विचार करूया. शाळा उशिरा सुरु होतील पण सुरु नक्की होतील. कदाचित पुढच्या दिवाळी, नाताळच्या सुट्ट्या यंदा मिळणार नाहीत. म्हणजे अशी शक्यता आहे, कारण शिक्षण विभागाने अजून शाळांच्या बाबतीत काहीच जाहीर केलेलं नाहीये. पण समजा शाळा सुरूच झाल्या नाहीत तू म्हणतोस तसं तर काय बरं होईल? एक वर्ष सगळ्यांचंच शिक्षण थांबेल. थांबू देत. त्याने काहीही फरक पडत नाही. राहता राहिला आईबाबा ऑफिसला जायला लागल्यावर तुम्हाला मुलांनी काय करायचं हा प्रश्न तर तो खरंच बिकट आहे. आता सगळे घरात आहेत त्यामुळे ठीक आहे. पण उद्या समजा आईबाबा ऑफिसला जायला लागले आणि मुलांच्या शाळा चालू झाल्या नाहीत तर तुम्हा मुलांची जबाबदारी अजूनच वाढणार आहे. मी तुला घाबरवत नाहीये पण आपण एका अत्यंत कठीण काळातून जातोय त्यामुळे काय काय होऊ शकेल याचा जसा तू विचार करतो आहेस तसा तो केलाच पाहिजे. पण ऑफिस सुरु झालं आणि शाळा नाही तर आईबाबा काहीतरी पर्यायी व्यवस्था करतीलच ना. आलटून पालटून ऑफिसला जातील किंवा मग आजीआजोबा घरी येऊन राहतील. शिवाय सरकारही यावर काहीतरी विचार करेलच. उत्तरही शोधेल. त्यामुळे तू काळजी करू नकोस.
अगदी आईबाबांपासून सरकारपयर्ंत सगळेच करतील!आणि हो, शाळा होतील सुरु! शाळेत जाऊन तुम्हा मुलांना मस्त दंगा करता येणार आहे. एकत्र डबा खाता येणार आहे, गप्पा मारता येणार आहेत. हे सगळं होणार आहे.