मी पेपरमध्ये वाचले की कोरोनासाठी कोणतीही लस तयार झालेली नाही. त्यावर अजून कुठलंच औषध नाही. परंतु बातम्यांमध्ये सांगतात की कोरोनाचे पेशंट बरे होऊन आपल्या घरी परतले हे कसं काय? म्हणजे आपल्याकडे कोरोनाचं औषध आहे का?-आयुषी तेलतुंबडे, चंद्रपूर
सर्दी, कोरडा खोकला, ताप आणि न्यूमोनियाची लक्षणो असतील तर त्या व्यक्तीने तातडीने तपासणी करून घेण्याची आवश्यकता असते. कोरोना संशयित रुग्ण जेव्हा रुग्णालयात दाखल होतो त्याला त्याच्या लक्षणानुसार उपचार केले जातात. कोरोना हा विषाणू माणसाच्या प्रतिकारशक्तीवर हल्ला चढवतो. ज्या व्यक्तींची तब्येत उत्तम असते, ज्यांना आधीचे कुठले आजार नसतात, अशा बहुतेक व्यक्तींची प्रतिकार शक्ती उत्तम असते. त्यामुळे अशा व्यक्तीचं शरीर कोरोनाच्या विषाणूला जोरदार प्रतिकार करतं आणि आधीच माहित असलेल्या काही औषधांच्या मदतीने या विषाणूचा हल्ला परतवून लावतं. असे लोक कोरोनाशी फाईट करून बरे होतात.- पण सगळ्यांचंच शरीर ही फाईट करू शकत नाही.
अशा व्यक्तींमध्ये हा संसर्ग बळावतो आणि श्वास घ्यायला त्रस होऊन शेवटी त्यांचा मृत्यू ओढवतो. आयुषी हे बघ, सध्यातरी कोरोनावर औषध नाही, पण लक्षणांवर उपचार करून जगभरात 14 लाख रुग्णांपैकी 3 लाख लोक बरे होऊन घरी गेलेले आहेत. म्हणजे कोरोना बरा होतो त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही. फक्त हा आजार पसरू नये यासाठी आपण सगळ्यांनीच योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक आहे. सरकरने ज्या ज्या गोष्टी आपल्याला पाळायला सांगितलेल्या आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत. फक्त जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठीच घराबाहेर पडायचं. सतत साबणाने हात धुवायचे. एकमेकांचे मास्क वापरायचे नाहीत. सोशल डिस्टंसिंग पाळायचं. या गोष्टी आपण केल्या की कोरोना नक्की पळून जाईल.