लहान मुलांच्या बोलण्यात , लिहिण्यात खूप ताकद असते . ही ताकद असते प्रेमाची. हीच ताकद वापरून अमेरिकेतील काही विद्यार्थी आज अडचणीत असलेल्यांना, घाबरलेल्यांना आणि लॉकडाऊनमुळे आपापल्या घरात एकेकट्या असलेल्या मोठ्या माणसाना खूप आनंद देताहेत. हा आनंद पसरवण्यासाठी ही मुलं इमेलचा वापर करताहेत. ही मुलं आहेत इंग्लंडच्या वॉर्सेस्टर येथील नॉर्थवीक मॅनरमधील. शाळेला कोरोनामुळे सुट्या लागल्यावर काय करायचं असा प्रश्न या मुलांनाही पडला. आजूबाजूची परिस्थीती बघता आपल्याला ही सुट्टी मौजमजेसाठी मिळालेली नाही, हे या मुलांना कळलं. म्हणूनच त्यांना वेगळं काहीतरी करायचं होतं. सारा मिरॉन ही यांच्यापैकी एका मुलाची आई. तिने या मुलांना एक भारी अॅक्टिव्हिटी सुचवली. ती म्हणाली, की आपापल्या घरात क्वारंटाईनमध्ये जे एकेकटे आहेत, अशा मोठया माणसांना तुम्ही ईमेल का नाही लिहीत? इमेल करून कोरोनामुळे एकटे झालेल्या लोकांची विचारपूस करायची. तुम्ही या परिस्थितीत एकटे नाहीत असा विश्वास त्यांना द्यायचा. मुलांना सारा आण्टीने सूचवलेली ही आयडिया खूप आवडली. सारा आण्टीने मग मुलांना अशा एकेकट्या लोकांचे इमेल अॅड्रेस मिळवून दिले सात वर्षाच्या जेकबनं लगेच एक इमेल लिहिली. त्यात तो म्हणतो, ‘तुम्ही खूप काळजी करताय का? वाईट वाटतंय का तुम्हाला? भीती वाटतेय का? घाबरू नका. तुम्हाला एकटं वाटू नये, म्हणूनच मी ही ई मेल लिहितो आहे. हे सगळं लवकरच संपेल!’ मुलांचे हे इमेल नर्सिंग केअर होममध्ये उपचार घेत असलेल्या लोकांना खूपच आवडले. आता तर जेकब आणि त्यांच्या मित्रंच्या शाळेनं कोरोनानंतर जेव्हा पुन्हा शाळा सुरू होईल तेव्हा अडचणीत असलेल्यांना मुलांनी इमेल लिहिण्याचा हा प्रोजेक्ट सुरू ठेवण्याचं ठरवलं आहे.
coronavirus : इंग्लंडमधली मुलं लिहिताहेत मोठ्या माणसांना इमेल्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 6:55 AM
हाय, भीती वाटतेय का तुम्हाला?
ठळक मुद्दे कोरोनानंतर जेव्हा पुन्हा शाळा सुरू होईल तेव्हा अडचणीत असलेल्यांना मुलांनी इमेल लिहिण्याचा हा प्रोजेक्ट सुरू ठेवण्याचं ठरवलं आहे.