ज्यावेळी एखादी आपत्ती येते जशी आता कोरोना विषाणूमुळे आली आहे तेव्हा लोकांचे जीव वाचवण्यासाठी शहर बंद केलं जातं. आवश्यकता असल्यास देशही बंद केला जातो. त्याला लॉकडाउन म्हटलं जातं. आपल्याकडे सध्या लॉकडाउन जाहीर झाला आहे कारण कोरोनाचा प्रचंड धोका आहे. लोक रस्त्यावर आले, बाहेर पडले तर हा धोका वाढू शकतो म्हणून शहरं बंद केलेली आहेत. दुकानं, थिएटर्स, नाटय़गृह, जिम, स्विमिंग पूल, बागासगळं बंद आहे. फक्त अत्यावश्यक सेवा जसे की औषधाची दुकानं, किराणा, भाजीपाला, दूध या गोष्टी मिळणारी ठिकाणं उघडी ठेवायला परवानगी आहे. लॉकडाउन फक्त आपल्याकडे केलं आहे का? तर नाही, जगातले अनेक देश आता लॉकडाउन आहेत कारण कोरोना हा आजार जगभर पसरलेला आहे. या काळात जीवनावश्यक वस्तू घेण्यापुरतं बाहेर जायला परवानगी असते. त्यापलीकडे काहीही काम करायला कुणीही कुठेही बाहेर जाऊ शकत नाही. म्हणूनच तर आईबाबा वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यांची ऑफिसेस बंद आहे. त्यामुळे त्यांना घरून काम करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. आपण फक्त लॉकडाउन केलेलं नाही तर परदेशातून येणा:या विमानसेवाही बंद केल्या आहेत. कारण कोरोना विषाणू परदेशातून आपल्याकडेआलेला आहे. तो इथे जन्माला आलेला नाही. त्यामुळे परदेशातून अजून कोरोनाबाधित लोक यायला नकोत यासाठी आपण परदेशी विमानसेवा बंद करून टाकली आहे.
लॉक -डाउनच्या काळातही बाहेर पडायला बंदी असते. शिवाय आता घरात बसणं ही तुम्हा मुलांसकट सगळ्यांची जबाबदारी आहे. तरच कोरोनाला आपण हरवू शकतो. लॉकडाउन आहे तर घाबरून जाऊ नका. गरजेचं सगळं उपलब्ध आहे. फक्त आपल्या सेफ्टीसाठी आपण सध्या घरातच थांबायचं आहे. घरातच मजा करायची आहे. शिवाय आपल्या सोबतीला टीव्ही आणि पुस्तकं असतंच, काय?