मॅडलिन, ऑलिव्हिया, कॅमेरॉन आणि ज्ॉक फ्रान्स ही चार सख्खी भावंडं. अमेरिकेत राहातात. लॉक डाऊनमुळे अख्खं जग काहीही काम न करता घरात बसून आहे. पण ही चार भावंडं मात्र खूप बिझी आहेत. ही मुलं सध्या ग्रीटींग कार्ड बनवत आहेत. शाळेला कोरोनामुळे सुटी मिळाल्यामुळे आता काय करायचं असा प्रश्न या चौघांनाही पडला. मग त्यांनी ठरवलं की आपण असं काहीतरी बनवू या ज्यामुळे इतरांना आनंद होईल. म्हणून त्यांनी ग्रीटींग कार्ड बनवण्याचं ठरवलं. ही ग्रीटींग कार्ड ती त्या लोकांना वाटत आहे जे आज कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे घरात बंद आहेत.
अॅनाबेला आणि दानिका ही मावस भावंडंही या चौघांची मदत करत आहेत. या सगळ्या मुलांना हस्तकलेच्या वस्तू तयार करण्याची खूप हौस आणि इतरांना खूष करण्याची आवडही. या दोन गोष्टींची सांगड घालून ही भावंडं आपलं काम करत आहेत. या चौघांना त्यांची आई व्हेनेसा फ्रान्सकडून कळलं की कोरोना व्हायरसच्या संसर्ग झाल्यानं एकटे राहणारे रूग्ण सध्या खूप निराश आणि दुखी आहेत. हे ऐकून या मुलांना या रूग्णांसाठी काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली. त्यांच्या या कामामुळे त्यांची आई, नातेवाईक आणि त्यांच्या शेजारच्यांनाही त्यांचं खूप कौतुक वाटत आहे. ही मुलं अजून खूप ग्रीटींग कार्ड बनवणार आहेत. त्यांची आई म्हणते अजून त्यांच्याकडे खूप कागद आहेत.