आता पावसाळा सुरु होतोय, घराबाहेर विशेष जाता येत नसलं तरी गच्चीत किंवा घराच्या अंगणात, बिल्डिंगच्या पाकिर्ंगमध्ये तुम्ही अधूनमधून जातच असाल. पूर्वीसारखं पावसात खेळता येणार नाही यंदा, धुडगूसही घालता येणार नाही पण आपण घरच्या घरी काहीतरी नक्की करू शकतो. साहित्य: नारळ खवून उरलेली करवंटी, कागद, कागदी स्ट्रॉ किंवा आईस्क्रीम स्टिक किंवा इतर कुठलीही काडी ज्यापासून आपण शीड बनवू शकतो, रंग, डिंक कृती: 1) नारळ खवलेली करवंटी स्वच्छ धुवून घ्या. 2) आतल्या बाजूने नारळाचा गर राहिलेला असेल तर तो संपूर्ण काढून घ्या. 3) करवंटी कोरडी होऊ द्या. 4) स्ट्रॉ, स्टिक, काडी जे काही तुमच्याकडे असेल ते करवंटीच्या मधोमध उभं करा आणि करवंटीला चिकटवून टाका. 5) आता काडीच्या उंचीला आणि करवंटीच्या आकाराला शोभेल असा कागदाचा त्रिकोण कापा. 6) तुमच्याकडे रंगीत कागद असेल तर उत्तमच, नसेल तर त्या कागदाला हव्या त्या रंगाने किंवा मिश्र रंगांनी रंगवून घ्या. 7) हा कागद काडीला चिकटवा.
8) तुम्हाला तुमची होडीही मस्त दिसायला हवी असेल तर करवंटी ही रंगवा. 9) एक गोष्ट लक्षात ठेवा, करवंटी चॉकलेटी रंगाची असते त्यामुळे रंगवताना पांढरा, पिवळा असे रंग वापरा. निळा, जांभळा, हिरवा यातले गडद रंग उठून दिसणार नाहीत. 10) सध्या आपण बाहेर पावसाच्या पाण्यात जाऊ शकत नाही त्यामुळे घरातच एका टब किंवा बादलीत पाणी घ्या आणि त्यात ही होडी सोडा.