वाघ. या प्राण्याचं नाव घेतल्याबरोबर लगेच आपल्यातही शक्ती संचारसारखी वाटते की नाही? भारताचा राष्ट्रीय प्राणी असलेला वाघ आहेच तसा बलदंड. काय त्याची चाल, काय त्याचा रुबाब. त्याच्या नुसत्या एका डरकाळीनं सगळ्यांची पाचावर धारण बसते. त्याचा पंजा ही त्याची मुख्य ताकद. लहान आकाराच्या प्राण्यांना त्यानं एक दणका दिला तर त्यांची कवटी फुटून ते जागच्या जागी ‘राम’ म्हणू शकतात!वाघांचे अनेक प्रकार असतात. लहान, मोठे. आपल्याकडे आढळणारा वाघ साधारण दोनशे किलो वजनाचा असतो, मादी मात्र वजनानं कमी असते. प्रत्येक वाघानं आपलं क्षेत्र ठरवून घेतलेलं असतं आणि साधारण साठ ते शंभर चौरस किलोमीटर परिसरात त्याचं राज्य चालतं. दुस:या वाघांनाही तो आपल्या इलाक्यात येऊ देत नाही. एका झटक्यात ताशी 65 किलोमीटर वेगानं तो चाल करून जाऊ शकतो आणि एका ढांगेत तब्बल पाच ते सहा मीटरचं अंतरही कापू शकतो.आज आपल्याला व्यायाम करायचा आहे, तो हाच. दबा धरुन बसण्याचा आणि सावजाच्या मागे मागे जाण्याचा. या व्यायामाचं नाव आहे ‘क्राऊचिंग टायगर’.कसा कराल हा व्यायाम?1- दोन्ही गुडघे जमिनीवर टेका.2- आता दोन्ही हातही खाली जमिनीवर टेकवा. कोपरात वाका. 3- ज्यांना यात आणखी थरार हवा असेल, त्यांना हाताच्या पंजांऐवजी आपले कोपरही टेकवता येतील.4- जितकं खाली वाकता येईल तितकं वाका.5- नजर समोर ठेवा.6- आता एकेक हात आणि पाय पुढे टाकत हळूहळू पुढे चालत जा.यामुळे काय होईल?1- हातांची ताकद वाढेल.2- पंजांमध्येही बळकटी येईल.3- पाठीचा व्यायाम होईल.4- पाय आणि मांडय़ा मजबूत होतील. 5- वाकून चालल्यामुळे दंडाची मागची बाजू, म्हणजे ट्रायसेप्स स्ट्रॉँग होतील.लक्ष्यात घ्या, हा वाघाचा व्यायाम आहे. तोही त्याच्या शिकारीच्या वेळेचा. त्यामुळे झेपेल तेवढाच करा. नाहीतर आजारी पडून तुमचीच ‘शिकार’ व्हायची!- तुमचीच ‘वाघाची बच्ची’ ऊर्जा
दबा धरुन बसण्याचा आणि सावजाच्या मागे मागे जाण्याचा व्यायाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 7:30 AM
क्राउचिंग टायगर.
ठळक मुद्देहा वाघाचा व्यायाम आहे. तोही त्याच्या शिकारीच्या वेळेचा. त्यामुळे झेपेल तेवढाच करा.