तुम्ही जर शहाणी बाळं असाल, तर तुम्हाला एक काम कधी ना कधी घरातल्या मोठय़ा माणसांनी सांगितलंच असेल, ‘जरा कोप-यावरच्या बँकेत एवढा चेक टाकून ये गं / रे!’- आणि मग तुम्ही सायकल काढून कोप-यावरच्या बँकेत गेले असाल, तिथे स्लिपवर शिक्का कुठे मारायचा ते शोधलं असेल, हा चेक कुठल्या काउंटरवर भरायचा ते शोधलं असेल, आणि मग ती शिक्का मारलेली काउंटर स्लिप सांभाळून घरी घेऊन आले असाल. तुम्ही सांगितलेलं काम केलं असेल याची मला खात्री आहे.
मात्र त्याचबरोबर याही गोष्टीची खात्री आहे की, तुमच्यापैकी बहुतेकांनी हे काम त्यातलं एक अक्षरही न वाचता केलं असणार. पण जर तुम्हाला चेक बँकेत टाकणं हे पहिल्या पायरीवरचं काम येत असेल, तर त्या चेकची स्लिप भरायला शिकायला काहीच हरकत नाही. ते काम सोपं असतं, जबाबदारीचं असतं आणि अत्यंत महत्त्वाचं असतं. तुम्ही जर कुठल्याही बँकेची स्लिप बघितलीत, तर त्यात तुम्हाला अनेक रकाने दिसतील. खातेधारकाचं नाव, अकाउंट नंबर, तारीख, चेकवरचे डिटेल्स - यात तारीख, बँकेचं नाव, शाखा, चेक नंबर, रक्कम अशा अनेक गोष्टी भरायला लागतात. रोज हजारो बँकांमध्ये लाखो चेक्सची देवाण-घेवाण होत असते. त्यात कुठलाही गोंधळ होऊ नये म्हणून ही सिस्टीम लावलेली असते. या सुट्टीत हे काम नक्की शिकून घ्या. नंतर तुमच्या ज्युनिअर अकाउंटमध्ये चेक्स टाकताना तुम्हाला त्याचा उपयोग होईल. आणि हो, तुम्ही अजून बँकेत खातं उघडलं नसेल, तर लवकरात लवकर आई किंवा बाबांबरोबर तुमचं जॉइंट अकाउंट उघडा. पॉकेटमनी ठेवायला बँकेसारखी सुरक्षित जागा नसते !