येतेय की नाही मज्जा व्यायामाला?मला माहितीये, तुम्ही म्हणाल, ‘हा काही व्यायाम आहे का? ही खरंच नुस्ती मज्जा आहे. आणि सोप्पी पण आहे. अशी धम्माल करायची, यालाच व्यायाम म्हणतात, असं जर कोणी आधीच आम्हाला सांगितलं असतं, तर आम्ही कधीचेच नसतो का व्यायामाला लागलो? आम्हाला आधी वाटलं होतं, व्यायाम करायचा, म्हणजे जीममध्ये जायचं, ती मोठमोठ्ठी वजनं उचलायची, अंगातले कपडे ओले होईर्पयत घाम गाळायचा आणि नंतर हाशहुश्श करत बसून घ्यायचं!’बरोबर ना, असंच वाटलं होतं ना तुम्हाला? खरंतर त्याला व्यायाम म्हणतच नाही. मी तर त्याला हमाली म्हणते! आणि एवढीच तुम्हाला वजनं उचलायची हौस असेल तर घरातली कामं करा ना! घरातल्या त्या मोठमोठय़ा वजनदार गाद्या उचलून उन्हात घाला, धान्याची पोती गच्चीवर नेऊन तिथे धान्य वाळत घाला! फ्रीज, बेडखाली किती धूळ असते, ती सरकवून त्याखालची धूळ साफ करा. मग तुम्हाला जीममध्ये जाऊन वजनं उचलण्याची गरजच पडणार नाही. शिवाय तिथे जाऊन किती पैसे वाया घालवतात ही मोठी माणसं! आणि घरी आल्यावर ‘थकलो’ म्हणून पुन्हा ठिय्या‘जाऊ दे ते मोठय़ांच्या व्यायामाचं.आज मी तुम्हाला आणखी एक भारी व्यायाम शिकवते.
या व्यायामाचं नाव आहे ‘साष्टांग दंडवत’!
आई-बाबांना तुम्ही दाखवाच एकदा हा व्यायाम करून. पण हा काही खरोखरचा नमस्कार नाही हं. तसा दिसतो तो फक्त.खाली बसायला एक जाड मॅट घ्या. म्हणजे टोचणार नाही. आता पाय मागे घेऊन टाचेवर बसा. पायांची बोटं जुळलेली असू द्या. आता हळूहळू पुढे वाका, पाठ सरळ ठेऊन हात पुढे न्या आणि डोकंही जमिनीला हलकेच टेकवा. असं करत असताना समजा आई खरंच समोर उभी असेल, तर तिला वाटेल, आपण तिला नमस्कारच करीत आहोत! पण हे पाहताना तिलाही नक्कीच आनंद होईल. लक्षात घ्या, पुढे वाकत असताना आपलं आपलं ‘ढू’ आणि मांडय़ा थोडय़ा मागे खेचायच्या, पण जागेवरुन हलायचं मात्र नाही! आहे की नाही मज्जा!या व्यायामामुळे तुमच्या मांडय़ा, घोटे, पाठ आणि ‘ढू’ला ताण मिळेल. त्यामुळे तुम्हाला एकदम छान तर वाटेलच, पण समजा एखादेवेळी आईला मदत करून, खेळून तुम्ही खरोखरच खूप दमला असाल, तर हा व्यायाम केल्यावर तुम्हाला एकदम रिलॅक्स वाटेल. तुमचा थकवा कुठल्याकुठे पळून जाईल.मग पळवाच तुमचा हा थकवा आणि आळसही.- तुमची ‘साष्टांग’ मैत्रीण, ऊर्जा