घरात जुन्या पेपर प्लेट असतातच, वाढदिवसाला आणलेल्या आणि शिल्लक राहिलेल्या. त्यापासूनच आपण सिंह बनवूया. हा सिंह तुम्ही नुसताच तुमच्या खोलीत लटकवू शकता किंवा त्याचा मास्कही बनवू शकता. साहित्य: पेपर प्लेट, कात्री, पिवळा आणि चॉकलेटी रंग, काळं स्केचपेन, पंचिंग मशीन आणि दोरा. कृती: 1) पेपर प्लेटला बाहेरच्या बाजूने माकिर्ंग असतं. एक प्रकारचं डिझाईन. छोटे फोल्ड्स असतात. त्या प्रत्येक फोल्डने तयार झालेल्या रेषांवर इंचभर कापून घ्या. संपूर्ण पेपर प्लेट ला असे कट घेतलेत कि झाली सिंहाची आयाळ. 2) आता पेपर प्लेट पिवळ्या रंगाने रंगवून घ्या. 3) आयाळ पिवळसर चॉकलेटी रंगाने रंगवा. 4) रंग वाळू द्या. 5) पेन्सिलने सिंहाला डोळे, तोंड, मिशा काढा आणि काळ्या स्केच पेनने त्यावर गिरवा. म्हणजे चेहरा उठावदार दिसेल. 6) आता या पेपर प्लेटच्या मध्यावर पण प्लेटच्या टोकांशी दोन्ही बाजूंना एक एक छिद्र पाडून घ्या. 7) सिंहाच्या तोंडाच्या विरुद्ध दिशेने जाईल असा दोरा ओवा. 8) आता तुम्ही तुमचा सिंह तुम्हाला हवा तिथे लटकवू शकता.
9) मास्क बनवायचा असेल, तर मोठ्यांच्या मदतीने डोळ्याची जागा कापा आणि दोरा डोक्याच्या आकाराने बांधून घ्या. 10) मास्क चढवून, सिंह गर्जना करत घरातल्या सगळ्यांना घाबरवून सोडा, आहे की नाही धम्माल!