आमच्या घरात कुठलं वाहन आहे? काही जणांकडे फोर व्हीलर असते, काहींकडे बाइक असते, काहींकडे स्कूटर असते तर काहींकडे सायकल असते. पण आज बहुतेक सगळ्या घरांमध्ये यातलं किमान एकतरी वाहन असतंच. आणि आईबाबांबरोबर आपणही ते वाहन कुठल्या ना कुठल्या पद्धतीने वापरत असतो. आपण गाडीतून फिरायला जातो. बाइक किंवा स्कूटरवर आपल्याला कोणीतरी शाळेत सोडतं, घ्यायला येतं. काही वेळा सायकल तर आपल्यासाठीच घेतलेली असते. आणि समजा नसली जरी, तरी आपण ती सायकल खेळायला, चक्कर मारायला वापरलेलीच असते.
पण यातलं कुठलंही वाहन आपण कधी धुतो किंवा पुसतो का? तर नाही. म्हणजे आपण सायकल, स्कूटर, बाइक, गाडी वापरणार आणि ते पुसायचं काम मात्र बाबा-काका-दादा-ताई-आई- आत्या असं कोणीतरी करायचं. याला काय अर्थ आहे? आपल्या घरातली वाहनं आपणपण पुसली पाहिजेत. त्यात सायकल सगळ्यात सोपी. तशी बाइक आणि स्कूटरपण सोपी. त्याचं सीट पुसायचं, पुढचा आणि मागचा भाग पुसायचा, दिवे, आरसे आणि नंबर प्लेटपुसायची, की झालं ! सगळ्यात शिकायला लागतं, ते गाडी धुवायला. कारण गाडी धुवायची सुरुवात तिच्या टपापासून करावी लागते. आधी वरची धूळ झटकायची, मग टप ओल्या फडक्याने पुसून घ्यायचं. त्यानंतर सगळ्या काचा कोरडय़ा फडक्याने झटकायच्या. मग काचा सोडून उरलेली गाडी धूळ झटकून ओल्या फडक्याने पुसून घ्यायची. आणि सगळ्यात शेवटी काचा पुसायच्या. काचा पुसताना जास्त पाणी घ्यायचं आणि ते पूर्णजाईर्पयत काच वरून खाली अशी एकसारखे स्ट्रोक्स देऊन पुसायची. नाहीतर होतं काय? की आपल्या हातून थोडी धूळ राहून जाते. मग ती धूळ पुसली जाण्याऐवजी काचेवर सारवल्यासारखी पसरते. उजेडात ते लक्षात येत नाही. पण समोरून हेडलाइट्सचा प्रकाश आला की ड्रायव्हरला समोर बघायला त्रास होतो. त्यामुळे पुढची आणि मागची काच फार काळजीपूर्वक पुसायला लागते. पण अर्थात हे झालं आपल्याला निवांत वेळ असेल तेव्हासाठी. पण जर घाईघाईत गाडी पुसून जायचं असेल तर? तर काय पुसायचं आणि काय राहू द्यायचं? तर अशा वेळी सगळ्या काचा, आरसे आणि नंबरप्लेट्सपुसायच्या आणि बाकी सगळं राहू द्यायचं. एकदा करून बघा. म्हणजे ही सक्तीची सुट्टी संपली की तुम्ही स्वच्छ केलेल्या गाडीतून किंवा गाडीवरून तुम्हाला चक्कर मारता येईल.