- रणजितसिंह डिसले, प्राथमिक शिक्षक, परितेवाडी शाळा
तुम्हांला नाम्या जोशी नावाची मुलगी माहितीय का? कधी तीच नाव ऐकलय का? नाही म्हणता, बरं. मी सांगतो. नाम्या ही 14 वर्षांची मुलगी पंजाबमधील जालंधर येथील सतपाल मित्तल शाळेची विद्यार्थिनी. तुमच्याच वयाची आहे. जानेवारी महिन्यात मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला भारत दौ?्यावर आले होते, त्यावेळी त्यांनी नाम्याला व्यासपीठावर बोलावून सर्वांसमोर तीच कौतुक केल. असं काय केल तिने, ज्यामुळे तीच एवढ कौतुक करण्यात आलंय? ती सध्या एका ध्येयाने झपाटलेली आहे, तीच एक ध्येय वाक्य आहे, इच वन टीच टेन! एकाने किमान 10 जणांना शिकवायचे. ती रोज किमान 10 जणांना ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून शिकवते. कोण कोण असतं तिच्या ऑनलाईन क्लास मध्ये, तर तुमच्याच वयाची मुले आणि जगभरातील अनेक देशांतील शिक्षक. हो शिक्षक सुद्धा . ती त्यांना गेम तयार करायला शिकवते, तंत्रज्ञांच्या नवनवीन क्ल्युप्त्या शिकवते. तुम्ही रोज टीव्हीवर रामायण बघत असालच, तर याच रामायणावर आधारित गेम तिने तयार केला आहे, जो प्रचंड लोकप्रिय झाला. तुम्हांला प्रश्न पडला असेल कि आमच्या शाळेत तर असलं काही शिकवलं जात नाही, मग नाम्या कुठून शिकली आहे? नाम्या गेली कित्येक वर्षे ऑनलाईन शाळेत जाते, आणि या नवनव्या बाबी शिकून घेते. म्हणतात न कि ज्ञान दिल्यानं वाढतं; नाम्या नेमकं हेच करतेय. अनेकांना शिकवत असताना ती स्वत:देखील शिकत आहे. मग नाम्याच्या ऑनलाईन शाळेत जायला आवडेल का तुम्हाला?