पेगी नावाची दहा वर्षाची मुलगी. ती कॅलिफोर्नियामधील रिव्हरसाइड या शहरात राहाते. जेव्हापासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला तेव्हापासून तिच्या आईनं तिला आपल्या आजी आजोबांना स्पर्श करायचा नाही. त्यांना मिठी मारायची नाही अशी अट घातली. तिची आई लिंडसे ओक्रे ही नर्स असून रिव्हरसाइड येथील एका कम्युनिटी हॉस्पिटलमधे कोरोना रूग्णांची काळजी घेण्यासाठी बनवण्यात आलेल्या युनिटमधे काम करते. कोरोनाच्या काळात घरातील वृध्दांना जपणं गरजेचं आहे म्हणून पेगीच्या आईनं तिला आपल्या आजी आजोबांना मिठी मारायची नाही असं बंधन घातलं.पेगीला परिस्थितीचं गांभीर्य कळल्यामुळे तिनंही आपल्या आईची सूचना पाळली. पण आपल्या आजी आजोबांना मिठी न मारण्याच्या अटीमुळे ती फारच दु:खी होती. आपल्या आजी आजोबांनी आपल्या कवेत घ्यावं, आपले लाड करावेत असं तिला सारखं वाटत होतं. पण कोरोनामुळे ती ते करू शकत नव्हती. पण इंटरनेटवर वाचता वाचता तिला एक छान पर्याय सापडला. आपल्या प्रिय व्यक्तींना मिठी मारण्यासाठी अनेकांनी वेगवेगळे पर्याय शोधले होते. पेगीलाही एक पर्याय मिळाला. शॉवर कर्टनला मॉडिफाय करून ‘हग कर्टन’ बनवण्याची युक्ती तिला सूचली. तिनं ही कल्पना आपल्या आईला सांगितली. तिच्या आईलाही ही कल्पना आवडली. मग दोघींनी मिळून या पडद्यावर काम करायला सुरूवात केली. घरातील शॉवर कर्टन, झिप लॉक पाऊचेस आणि डिंक यां़चा वापर करत पेगीनं ‘हग कर्टन’ तयार केला.तो कर्टन दाराला लावला. पडद्याच्या एका बाजूला ती उभी राहिली आणि पडद्याच्या दुस :या बाजूला तिचे आजी आजोबा उभे राहिले. पडद्याला तिनं चार मोठी भोकं केली होती. ज्यातून हात घालून एकमेकांना मिठी मारण्याचा आनंदही घेता येईल आणि शरीराचा स्पर्शही टाळता येईल. हा हग कर्टन वापरून पेगीनं आपल्या आजीआजोबांना मिठी मारण्याची इच्छा पूर्ण केली. आपल्या नातीनं शोधलेली ही कल्पना तिच्या आजी आजोबांनाही खूप आवडली. आपल्या प्रिय माणसांना भेटण्य़ाची पेगीनं शोधून काढलेली युक्ती अनेकांना आवडतो आहे. तिच्या आईनं हग कर्टनचा वापर करून मिठी मारण्यावर बनवलेला व्हिडीओ फेसबुकवर टाकल आहे. हा व्हिडीओ खूप जणांऩा आवडतो आहे.पेगीचं सगळीकडून कौतुक होत आहे.
--------------------------------------------