- रणजितसिंह डिसले,प्राथमिक शिक्षक, परितेवाडी शाळा मित्रनो, तुम्ही कधी मिस्ट्री स्काईप हा गेम खेळलात का? नाही, बरं आज त्याविषयी जाणून घेवूयात. हा गेम आहे समोरच्या शाळेतील मुलांचे लोकेशन शोधण्याचा. हे लोकेशन शोधण्यासाठी त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारायचें आणि त्यातूनच त्याचं लोकेशन शोधायचं. यासाठी तुमच्याकडे हवा जगाचा नकाशा. ज्या शाळेतील मुलं कमीत कमी प्रश्नांत हे शोधून काढतात तो विजेता ठरतो. ज्या शाळेतील मुलांसोबत हा गेम खेळणार त्यांच्याविषयी कोणतीही माहिती मुलांना द्यायची नाही. त्यांच्या वेशभूषा, व्यक्तिमत्व , यावरून मुलं प्रश्नांची रचना करत जातात. सर्वात अगोदर जगाच्या नकाशात त्यांचं लोकेशन शोधण्यासाठी ते ज्या खंडात राहतात, त्याबद्दल प्रश्न विचारायचे, जसं कि तुम्ही उत्तर गोलार्धात राहता कि दक्षिण गोलार्धात. याला त्यांचा जो प्रतिसाद येतो त्यावरून मग त्या गोलार्धातील खंड शोधण्यासाठी प्रश्न विचारायचे. एकदा का त्यांचा खंड माहिती झाला कि मग भौगोलिक, सांस्कृतिक , भाषिक वैशिट्यांच्या आधारे त्यांचा देश माहिती करून घ्यायचा. अनेकदा मुलं चुकतात, मग दिशांच्या आधारे तो देश शोधता येतो.आता या खेळातून नकाशावाचन , दिशा ज्ञान, त्या त्या देशाची वैशिट्य याविषयी मुलांना माहिती मिळत जाते. एकदा का त्यांचा देश शोधला कि मुलं परस्परांमधील अंतर नकाशाच्या मदतीने काढतात. काहीजण तर लगेच गुगल वरून अंतर काढतात. अंतराचं मोजमाप, आकडेवारी, दिशा, नकाशावाचन हे पाठ्यघटक वेगळे शिकायची गरजच नाहीये. हा गेम जितक्या वेळा खेळाल, तितकं हे ज्ञान अधिक दृढ होतं. मग खेळणार ना तुम्ही पण..?