आम्ही आमच्या घरी सुरक्षित आहोत पण जे गरीब लोक रोज काम करून पोट भरतात; आता ते काय करतील? - सुनील दराडे
सुनील, तू खूप महत्वाचा प्रश्न विचारला आहेस.आपल्या देशाची लोकसंख्या हा आपल्या पुढचा मोठा प्रश्न आहे. सोशल डिस्टंसिंगचा कितीही प्रयन्त झाला तरी लोकसंख्क्येमुळे कुठे ना कुठे या नियमांना तडेही जात आहेत. गरिबांची परिस्थिती सध्या बिकट आहे. जवळपास दोन महिने फक्त आपलाच देश नाही तर निम्म्याहून अधिक जग बंद आहे. अशा परिस्थिती अनेक उद्योग धंद्यांना जोरदार फटका बसला आहे. अनेकांचे जॉब्स गेले आहेत. हातावर पोट असलेल्यांची परिस्थितीही बिकट आहे. कारण हाताला काम नाही. अशा परिस्थितीत जे लोक आपल्या घरात सुरक्षित आहोत, त्यांची जबाबदारीही जास्त आहे. मोठी आहे. मिळतंय किंवा आपण विकत घेऊ शकतोय म्हणून अन्नधान्यांची नासाडी करणं थांबवलं गेलं पाहिजे. गरज नसताना अन्नधान्याचा साठा करता कामा नये. जे आहे ते सगळ्यांना पुरलं पाहिजे हा विचार सतत मनात असला पाहिजे सरकारने अन्नधान्यासंदर्भात सवलती जाहीर केलेल्या आहेतच पण आपल्याला जितकं शक्य आहे तितकं आपण केलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला कुणाला मदतीची गरज असेल तर मदत केली पाहिजे. ती करत असताना सगळे नियम पाळूनच केली पाहिजे. मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरून जगपरिवर्तन करण्याची गरज नसते. आपल्या छोट्या छोट्या प्रयत्न मधूनच जग बदलत असतं हे मात्र नक्की लक्षात ठेवलं पाहिजे. आणि शक्य असेल तिथे छोटे छोटे प्रयत्न करत राहिलं पाहिजे.