तुम्हाला कधी तुमच्या मोठ्या भावाने किंवा बहिणीने रेस्टॉरंटमध्ये नेलंय का? जनरली हे कॉलेजला जाणारे ताईदादा आपल्या धाकट्या भावंडांना अशा ठिकाणी कधीच नेत नाहीत. पण कधीतरी सगळी भावंडं कुठल्यातरी कार्यक्रमाला एकत्र जमली की ते मेहेरबान होतात आणि मग आपल्याला सुद्धा रेस्टोरंट किंवा कॅफेमध्ये घेऊन जातात. तिथे जाऊन आपण अर्थातच आईस्क्रीम मागतो, पण हे ताईदादा लोक उन्हाळ्याच्या दिवसात हटकून आईस्ड टी मागवतात.
मस्त उंच ग्लास, त्यात डार्क सोनेरी - चॉकलेटी रंगाचा आईस्ड टी, त्यात तरंगणारे बर्फाचे खडे आणि स्टायलिश वेटोळं केलेला किंवा निदान अर्धा वाकवलेला स्ट्रॉ! मग आपणही एखादा घोट पिऊन बघतो. मस्त गार, किंचित लिंबू घातलेला, बेताचा गोड असलेला आईस्ड टी आपल्यालाही आवडतो. पण आपल्याला काही तो परत मिळत नाही. कारण आपल्याला कोणी हॉटेलमध्ये नेत नाही. आणि आईस्ड टी कोणी घरी पार्सल करून आणत नाही. मग आपण आईस्ड टी प्यायचा कधी आणि कसा?तर कधीही! आपण घरच्या घरी करून!एकदम सोप्पा प्रकार आहे. साधारण चार ग्लास आईस्ड टी करण्यासाठी पाऊण कप पाणी घ्यायचं. त्यात पाच-सहा चमचे साखर घालायची. (साखर कमी वाटली तर नंतर सुद्धा घालता येते.) त्याला उकळी येऊन साखर विरघळली की पाऊण चमचा नेहेमीची चहा पावडर टाकायची. (फक्त त्याला इतर कुठला फ्लेवर नको. म्हणजे चॉकलेट, रोज, वेलची, आलं असा कुठला वास नको.) साधारण अर्धा-एक मिनिट उकळलं की हा चहा चार ग्लास गार पाण्यात गाळून घ्यायचा. त्यात अधर्ं लिंबू पिळायचं. वाटली तर अजून थोडी साखर घालायची. आणि वरून बर्फ घालून गार करून प्यायचा.एकदा करून बघा!! घरची मोठी माणसं पुन्हा पुन्हा फर्माईश करतील!