सध्या संध्याकाळ झाली की आभाळ भरून येतं. दिवसा पांढरे ढग असतात आभाळात आणि संध्याकाळ व्हायला आली की काळ्या ढगांनी आभाळ भरून जातं. काही काही वेळा तर ढगांचे इतके मस्त आकार तयार होतात की त्यात एक उडी मारून मस्त लोळावं वाटतं. अर्थात ते शक्य नसतंच. पण आता आपण कागदाचे मस्त गुबगुबीत मऊ ढग घरीच बनवू शकतो. साहित्य: मोठा पांढरा कागद, पंचिंग मशीन, स्केच पेन्स, रंगीत लोकर. निळ्या, जांभळ्या, लाल किंवा हिरव्या रंगाची. यातला रंग नसेल तर कुठल्याही रंगाची. कापूस
कृती:1) मोठ्या कागदांवर मोठे गुबगुबीत ढग काढा. 2) हे ढग नीट कापून घ्या. ढगाला डोळे काढून घ्या. 3) ते एकमेकांवर ठेवून ढगांच्या सगळ्या कडांपाशी पंचिंग मशीनने भोके पाडा. 4) भोकं पडताना भोकं ढगांच्या बॉर्डरपासून 1 सेंटीमीटर आत पाडा. आणि दोन भोकांच्या मध्येही 1 सेंटिमीटरचं अंतर ठेवा. 5) आता लोकर घ्या. आणि प्रत्येक दोन भोकातून ओवीत संपूर्ण ढग शिवून घ्या, फक्त कापूस घालायला थोडी जागा शिल्लक ठेवा. ढगांच्या पोटात कापूस भरा आणि ढगांचं मोकळं ठेवलेलं तोंड शिवून गाठ मारून घ्या.
6) झाला तुमचा मस्त गुबगुबीत कागदी ढग तयार. असे कितीही ढग तुम्ही बनवू शकता. 7) फक्त हे कागदी आहेत हे लक्षात ठेवा, त्यामुळे ओले झाले तर खराब होणार आणि त्यावर तुम्ही उड्या वैगेरे मारल्या तर फाटणार. अलगद वापरलेत तर खूप दिवस टिकतील.