काय ठीक आहे ना? मी तुम्हाला एक व्यायाम शिकवला होता. खरं तर तो व्यायाम नव्हता, वॉर्मअप होता. रोज व्यायामाच्या आधी करायची साधीसुधी अॅक्टिव्हिटी. ‘ढू’ला पाय लावून पळायचं ! ते तुम्ही केलंच असेल. पण वॉर्मअपचा तो फक्त एक प्रकार होता. तो तुम्हाला आवडलाच असेल. त्याच्यासोबत घरातल्या घरात एखादा अडुमधुडूम डान्स तुम्हाला करता येईल. जागच्या जागी उडय़ा मारता येतील. आपले हात सरळ आणि उलटे असे गोल-गोल फिरवता येतील. काल जसे पाय तुम्ही ‘ढू’ला लावले होते, तसे आता हात समोर जमिनीला समांतर ठेवून तुमचे पाय हातांनाही लावतायेतील. तर असा हा वॉर्मअप रोज, शक्यतो सकाळी करायचा. आज मी तुम्हाला आणखी एक व्यायामाचा प्रकार शिकवणार आहे.
आपल्याला काही घाई नाही. एका दिवसात आपल्याला दंडाच्या बेटकुळ्याही उडवायच्या नाहीत. खरं तर आपल्याला असलं काही आणि तेही आत्ता करायचंच नाहीए आपण मोठे झालो, म्हणजे कॉलेजबिलेजला जायला लागलो, की मग आपल्याला वाटलंच तर मग बघू पुढे. आपल्याला आत्ता फक्त फिट राहायचं आहे. आत्तापासून आपण फिट असलो, तर मग पुढे आपल्याला काहीही करता येतील. व्यायाम करायचा तर त्यासाठी थोडे ताणाचे, म्हणजे स्ट्रेचिंगचे, थोडे ताकदीचे, थोडे स्टॅमिना वाढवणारे असे एक्सरसाइज आपल्याला करायचे आहेत. आज आपण असाच एक भारी व्यायामाचा प्रकार शिकूया. त्याचं नाव आहे ‘पाठीचा पूल’! नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल काय करायचं ते.
काय करायचंय?
1. झोपा पाठीवर. दोन्ही हात आपल्या शरीराच्या बाजूला. गुडघे वाकवून आकाशाच्या दिशेनं.
2. आपल्या दोन्ही खांद्यांमध्ये जेवढं अंतर आहे, तेवढंच अंतर दोन्ही पायांमध्ये ठेवा. आता काय कराल?हसू नका. हं बरोब्बर! आपले हात आणि पाय टेकलेले ठेवून आपलं ‘ढू’ तेवढं वर उचलायचं. पाठीला थोडा ताण बसेल इतकंच.
3.पाठ वर उचलली, तरी ती सरळ, ताठ राहील इकडे लक्ष द्यायचं. पाठ वर घेताना श्वासही घ्यायचा, पाठ वर गेल्यावर एक सेकंद श्वास रोखायचा आणि परत हळूहळू खाली येताना श्वास सोडायचा. करा असं दहा वेळा. यामुळे तुमच्या पाठीत ताकद येईल. पाठ दुखत असेल, तर ते दुखणंही कमी होईल.जमेल? उद्या सांगा मला कोणाकोणाला जमलं आणि नाही जमलं ते !