मान्य आहे की बाहेर भयंकर ऊन आहे. हेही खरंय की सॉलिड उकडतंय. पण तरी बहुतेक ठिकाणी रात्री तर मस्त गार होतं. खरं म्हणजे संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाला की वारं सुटतं आणि मग दिवसभराचा उकाडा आणि तगमग जरा कमी होते. अशी वेळ झाली की आपण जायचं थेट अंगणात नाही तर गच्चीत. तीन विटा गोळा करायच्या, लाकडं गोळा करायची, लाकडाचा भुसा किंवा बारीक काड्या गोळा करायच्या, ज्यातून हवा घालता येईल अशी फुंकणी शोधायची, ही फुंकणी शक्यतो धातूची शोधायची, घरात रॉकेल असेल तर ते थोडं मागायचं, काड्यापेटी घ्यायची.. एवढी तयारी तुम्ही केलीत की तुमचा नेमका काय उद्योग चाललाय यावर लक्ष ठेवायला एक तरी मोठा माणूस येईलच. त्यांना येऊ दे. आपल्याला त्यांची मदत लागणार आहे. आणि जर कोणी मोठं आपणहून आलं नाही तर आपण जायचं आणि एखाद्या मोठ्या माणसाला बोलावून आणायचं. कारण आपल्याला पेटवायची आहे, चूल!तीच तीच. शहरातली मुलं फक्त मराठीच्या पुस्तकात वाचतात ती चूल. ती कशी मांडायची आणि कशी पेटवायची याचं तंत्र असतं. ते मोठ्या माणसांना माहिती असतं. खाली जाड लाकडं रचायची, त्यावर बारीक काड्या रचायच्या आणि त्यावर कोळसा ठेवायचा. या सगळ्याला थोडं रॉकेल शिंपडायचं म्हणजे चूल लौकर पेटते. मग काड्यापेटीने पेपरची गुंडाळी आणि पेपरने चूल पेटवायची. पहिला जाळ आणि धूर होऊन गेला की मग त्यात फक्त निखारे धगधगत राहतात. तोवर थांबायचं. घाई करायची नाही. आणि एकदा का ते नुसते निखारे पेटते राहिले की त्यात कांदे, बटाट्याच्या चकत्या, वांगी, खोब?्याच्या वाट्या, मक्याचं कणीस असले पदार्थ भाजायला ठेवायचे. आणि मग, सुमारे अध्र्या तासाने खरपूस भाजले गेलेले ते पदार्थ, तिथेच बसून, त्याच्यावरची काजळी झटकून तिखट मीठ लावून खाऊन टाकायचे.फक्त हे सगळं सुरु करण्याच्या पूर्वी शेजारी पाण्याच्या दोन मोठ्या बदल्या भरून ठेवायला विसरायचं नाही आणि सगळं खाऊन झाल्याच्या नंतर चुलीतली धग पूर्ण गेल्याशिवाय तिथून हलायचं नाही. कारण मजा करायची, पण सुरक्षित राहून!- आता तुम्ही जर का खेड्यात राहणारी मुलं असाल, तर तुम्हाला हे वाचून मजा वाटेल. पण तुम्हाला माहितीये का, की शहरात राहणार्या मुलांनी ही चूल कधी बघीतलेलीच नसते!
चूल कशी पेटवतात ? -माहितीये का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 4:04 PM
तुम्ही खेड्यात राहणारी मुलं असाल, तर तुम्हाला हे वाचून मजा वाटेल. पण तुम्हाला माहितीये का, की शहरात राहणार्या मुलांनी ही चूल कधी बघीतलेलीच नसते!
ठळक मुद्दे .. आज पेटवा चूल!