घरात बसून बसून कंटाळा येतोच, सारखं काय रंगवत बसायचं,, त्याचाही आता कंटाळा यायला लागला आहे. मग आता सोपं शिवणकाम केलं तर?या साठी मोठ्यांची मदत आवश्यक आहे. साहित्य:जुने पडदे किंवा कुठलंही जुनं कापड, सुई आणि दोरा. कृती: 1) जुना पडदा घेऊन त्यांच्या पायपुसण्याच्या आकाराचे चौकोनी तुकडे करा. 2) कात्रीने हे काम करावे लागले तेव्हा आईबाबांची मदत घ्या. कात्री व्यवस्थित जरी वापरता येत असली तरीही आईबाबांची परवानगी घ्या. 3) आता कापलेले दोन तुकडे एकमेकांवर ठेवा आणि सुईत दोरा ओवून चारही बाजूंनी टीप मारा. 4) धावती टीप अगदी सोपी असते. सुई आत घालायची आणि अगदी थोड्याशा अंतराने बाहेर काढायची. पुन्हा आत घालायची बाहेर काढायची. 5) किंवा आई, आजीला विचारलंत तर त्याही हाताने टीप कशी मारायची ते सांगतील.
6) चारही बाजूंनी शिवून झालं कि तुमचं पायपुसणं तयार. 7) कापड जाड असेल तर पायपुसणं म्हणून वापरता येईल. पातळ असेल तर घरातही वर कामांमध्ये जी फडकी लागतात त्यासाठी वापरता येईल.