आपल्या हाताचे पंजे आपल्यासाठी किती तरी गोष्टी करत असतात. बोटांच्या ठश्यातून चित्रकला आपण मागे बघितली होतीच. आता आपण पंज्याचा वापर करून रंगीबेरंगी फुलं बनवणार आहोत.
साहित्य: लाल, हिरवा, पिवळा, जांभळा रंग. याखेरीजही तुम्हाला जे रंग वापरायचे असतील तर तुम्ही वापरू शकता. घरातल्या बागेतली, कुंडीतल्या झाडाची छोटी पानं. समजा नाही मिळाली तरी हरकत नाही. ब्रश, पेन्सिल, डिंक, पांढरा कागद कृती :1) पांढरा कागद घ्या. तुम्हाला समजा तीन फुलं काढायची आहेत तर ती कुठे असली पाहिजेत त्या ठिकाणी पेन्सिलने छोटा बिंदू काढा. 2) तुमच्या डाव्या हाताच्या संपूर्ण पंजाला तुम्हाला आवडतो तो रंग लावा. जर तुम्ही डावखुरे असाल तर उजव्या तळहाताला रंग लावा. 3) आता तुम्ही जे तीन बिंदू काढलेले आहेत त्यातल्या पहिल्या बिंदूवर रंगीत तळहाताचा ठसा घ्या. 4) उरलेल्या दोन बिंदूंसाठी वेगळे रंग वापरा. 5) एखादं फुल आधीचा रंग न धुता त्यावर नवा रंग लावून मग ठसा घ्या. मल्टी कलर फुलं तयार होईल.
6) आता ठसे म्हणजेच फुलं वाळली की पेन्सिलने देठ आणि पाने काढा. 7) फुलांचे देठ हिरव्या रंगाने रंगवा. 8) पानांनाही डार्क किंवा लाईट हिरवा रंग द्या. 9) जर तुम्हाला छोटी पानं मिळाली असतील तर ती पानांच्या जागी चिकटवा. 10) बघा, फुलांचा सुंदर गुच्छ तयार झाला आहे. आहे की नाही सोप्पी युक्ती.