काय, मजा येतेय ना व्यायामाला. मला वाटलंच होतं. आपले व्यायाम आहेतच तसे भारी. कोणत्याही गोष्टीचा सुरुवातीला आपल्याला कंटाळाच असतो. पण एकदा का आपण ती रोज, सातत्यानं न कंटाळता करायला लागलो की ती आपल्याला आवडायला लागते. व्यायामाचंही नेमकं तसंच आहे. सुरुवातीला आपल्याला वाटतं, व्यायाम करून कुठे घाम गाळत बसायचा आणि अंग दुखवून घ्यायचं! पण मी तुम्हाला चॅलेंजनं सांगतेय, ज्यांनी आता नियमितपणो व्यायामाला सुरुवात केलीय, त्यांनाही व्यायामानं दुखलेलं अंग फारच आवडत असेल. खूप दमायचं नाही, पण व्यायामानं अंग थोडं दुखलं ना, की फार छान वाटतं. आज आपण आणखी एक हटके व्यायाम शिकणार आहोत. या व्यायामाचं नाव आहे ‘हाय नीज’! म्हणजे काय? त्याच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. हाय म्हणजे उंच आणि नीज म्हणजे गुडघे. याचाच अर्थ गुडघे उंच करायचे!
कसा करायचा हा व्यायाम?1- ताठ उभे राहा. दोन्ही पायात साधारण आपल्या खांद्याइतकं अंतर ठेवा.2- आता आपला उजवा पाय वर उचला. पण तो जमिनीला समांतर किंवा आपलं शरीर आणि मांडी यांच्यात 9क् अंशाचा कोन झाला पाहिजे.3- आता असाच प्रकार डाव्या पायानंही करायचा.4- यात आणखी थोडी गंमत आणायची असेल, तर आपले हातही कोपरात वाकवून जमिनीला समांतर ठेवा. उजवा पाय वर उचलला, की तो आपल्या उजव्या हाताला लागला पाहिजे आणि डावा पाय उचलला की तो डाव्या हाताला लागला पाहिजे.5- यात आणखी वेगवेगळे प्रकार करता येतात, पण लक्षात ठेवा, हा व्यायाम करताना आपली पाठ सरळ ठेवा. लुळ्यासारखे उभे राहू नका. दरवेळी आपल्या एकाच पायावर आपल्या संपूर्ण शरीराचं वजन आलं पाहिजे. 6- सुरुवातीला दोन्ही पायांचे दहा-दहा रिपिटेशन्स करा.यामुळे काय होईल?1- तुमचं हृदय बळकट होईल.2- स्टॅमिना वाढेल. 3- पाय मजबूत होतील.4- कार्डिओ एक्सरसाइज होईल.कराल मग हा गुडघे उचलायचा व्यायाम?